सोनाली फोगाटवर तीन महिन्यांपूर्वीही झाला होता विषप्रयोग

सोनाली फोगाटवर तीन महिन्यांपूर्वीही झाला होता विषप्रयोग

पणजी; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या तथा टिकटॉक स्टार अभिनेत्री सोनाली फोगाट खून प्रकरणाच्या तपासात नवनवीन खुलासे होत आहेत. सोनाली यांच्यावर सुमारे तीन महिन्यांपूर्वी विषप्रयोग झाला होता, अशी माहिती नाव उघड न करण्याचा अटीवर एका पोलिसाने दिली आहे. मुख्य संशयित असलेला त्यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान यानेच हा विषप्रयोग केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याचे या पोलिसाने सांगितले.

हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांची हणजुणे येथे कार्लिस बार येथे पार्टीत नाचत असताना प्रकृती बिघडली व त्या खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फोगाट कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान (पाल) व त्याचा मित्र सुखविंदर सिंग यांना तातडीने अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून यात कर्लिन बारचा मालक एडविन नुनीस, रूमबॉय दत्तप्रसाद गावकर व ड्रग्ज पेडलर रामदास मांद्रेकर यांचा समावेश आहे. सोनाली यांच्या खूनप्रकरणाच्या तपासात रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

काही महिन्यांपूर्वी सोनाली यांच्या हिसार-हरियाणा येथील घरी चोरी झाली होती. या चोरीनंतर त्यांचा स्वीय सहाय्यक सुधीरने घरातील नोकरांना काढून टाकले व नव्याने नोकरांची नेमणूक केली होती. सोनाली यांच्या खाण्या-पिण्यासंदर्भात सर्व गोष्टी सुधीर याच्या माध्यमातून होत होत्या. सुमारे तीन महिन्यांपूर्वी रात्री जेवल्यानंतर सोनाली यांना विषबाधा झाली होती. जेवल्यानंतर काही वेळात त्यांना उलट्या झाल्या होत्या. तसेच त्यांचे दोन्ही पाय लटके पडल्यासारखे झाले होते. त्यांच्यावर त्वरित उपचार झाल्यामुळे त्यावेळी त्या वाचल्या होत्या, अशी माहिती तपासात उघड झाल्याचे संबंधीत पोलिसाने सांगितले आहे. सोनाली यांच्या खाण्या-पिण्यावर सुधीर याचेच नियंत्रण असल्याने त्यानेच हा विषप्रयोग केला होता का, या प्रश्नाचे उत्तर पोलिस शोधत आहेत.

शरिर निळेकाळे पडले होते

कार्लिस बारमध्ये नाचताना पडल्यानंतर सोनाली यांना त्या हॉटेलच्या वॉशरुमध्ये दोन तास ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तशाच गंभीर अवस्थेत त्या निवासासाठी उतरलेल्या ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्ट येथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर निळेकाळे पडले होते, अशी माहिती एका पोलिसाने दिली.

पंतप्रधानांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत

सोनाली यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे वृद्ध माता-पिता यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. वडील महावीर सिंग ढाका व आई संतोष यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. सोनाली या भाजपच्या कार्यकर्त्या होत्या, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात उच्च स्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी महावीर यांनी केली. सोनाली यांच्या खुन्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करताना अखेरच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढत राहीन, असा निर्धार आई संतोष यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news