गोवा : 5 हजार 198 नव्हे तर 445 गोवेकरांनाच नोकर्‍या; मोप विमानतळावर भरतीबाबत अन्याय | पुढारी

गोवा : 5 हजार 198 नव्हे तर 445 गोवेकरांनाच नोकर्‍या; मोप विमानतळावर भरतीबाबत अन्याय

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पेडणे तालुक्यातील मोप विमानतळ पुढील महिन्यामध्ये सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. या विमानतळावर 5 हजार 198 लोकांना रोजगार मिळणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती, पण प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ 8 टक्के नोकर्‍याच देण्यात आल्याचा दावा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सरदेसाई बोलत होते. ते म्हणाले, की भाजपचे नेते मोप विमानतळाचा वापर पक्षाच्या आणि सरकारच्या प्रसिद्धीसाठी करत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे ते स्वागतार्ह आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने मोप विमानतळाला विरोध केलेला नाही. मात्र, तेथे गोवेकरांनाच रोजगार मिळावेत, अशी आमची मागणी आहे. विधानसभेत 5 हजार 198 लोकांना मोप विमानतळावर रोजगार मिळणार, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, त्याची पूर्तता होताना दिसत नाही. सध्या तेथे 445 गोवेकरांना विविध माध्यमातून रोजगार मिळाला असला तरी ही संख्या फक्त 8 टक्के भरते. यातील पेडण्यातील लोकांची संख्या फक्त पाच टक्के आहे. मोप विमानतळ हे पीपीपी तत्त्वावर बांधले जात आहे, मात्र खासगी क्षेत्रामध्ये गोवेकरांना 80 टक्के जागा राखीव मिळायला हव्यात. ही आमची मागणी आहे, तसा ठराव आपण विधानसभेला दिला होता अशी माहिती सरदेसाई यांनी यावेळी दिली.

जी एम आर सोबत पीपीपी तत्त्वावर सरकार हे विमानतळ बांधत आहे. त्यामुळे गोवेकरांना नव्हे तर तेलुगू लोकांना तेथे रोजगार उपलब्ध केले जाण्याची शक्यता असल्याचा आपल्याला संशय असल्याचे सांगून पेडणे आयटीआय मध्ये फक्त 140 जागा असताना तेथे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण सुरू करण्यात आल्याचे सरकार सांगत आहे आणि हे सारे खोटे असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.

पिसुर्ले-सत्तरी येथे टँकरने पाणी पुरवठा

हर घर जल 100 टक्के लोकांना दिल्याचा दावा सरकार करत असला तरी सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले गावांमध्ये नळाला पाणी येत नसल्यामुळे तेथे टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असल्याचा दावा सरदेसाई यांनी यावेळी केला.

काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न

काँग्रेसचे काही आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू ठेवला असून त्यातील काही आमदारांना मोपा विकास प्राधिकरण स्थापन करून त्याचे अध्यक्षपद देण्याचे आमिष दाखवण्यात येत असल्याचा दावा सरदेसाई यांनी यावेळी केला.

Back to top button