गोवा : मडगावचा नवीन नगराध्यक्ष कोण? | पुढारी

गोवा : मडगावचा नवीन नगराध्यक्ष कोण?

मडगाव; रविना कुरतरकर : मडगाव नगरपालिकेत गेले 15 महिने नगराध्यक्ष पदावर असलेले लिंडन परेरा यांचा कार्यकाळ संपुष्टात आला तरीही त्यांनी पदाचा राजीनामा न दिल्याने नागरसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. परेरा यांना खाली खेचण्यासाठी त्यांच्याच गटातील नगरसेवक सक्रिय झाले असून त्यांना दिगंबर कामत गटाच्या नगरसेवकांची साथ लाभल्याने कोणत्याही क्षणी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही नाराज नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना पाठिंबा देण्याची तयारी सुरू केल्याने भाजपातून नगराध्यक्ष पदासाठी दावा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.

परेरा हे गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्या फातोर्डा फॉरवर्डच्या गटातून निवडून आले होते. अलिखित करारानुसार सरदेसाई यांच्या आशीर्वादाने पालिकेचे नगराध्यक्ष पद गोवा फॉरवर्डचे लिंडन परेरा यांना सोपविले होते. गेल्या पंधरा महिन्यांपासून लिंडन परेरा नगराध्यक्ष पदावर आहेत. लिंडन यांचा कार्यकाळ 28 ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यानुसार त्यांनी राजीनामा देणे भाग आहे. तसे न झाल्याने त्याचे पडसाद सोमवारी मंडळाच्या 22 होणार्‍या महत्त्वपूर्ण बैठकीत उमटणार असे दिसते. काही नगरसेवकांशी चर्चा केली असता लिंडन परेरा यांना पायउतार करण्यासाठी एक गट सक्रिय झाल्याचे समजते. या गटात गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी गोवा फॉरवर्डच्या फातोर्डा फॉरवर्ड या पॅनलवरून निवडून आलेल्या श्वेता लोटलीकर यांनी भाजपात प्रवेश करून विजय सरदेसाई यांच्या गटाला सुरंग लावण्याचे काम केले होते.

अजूनही काही नगरसेवक आहेत जे नगराध्यक्ष होऊ इच्छितात. त्यांना दिगंबर कामत व विजय सरदेसाई यांच्यातील अलिखित करारानुसार संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.ज्या कार्यकाळात लिंडन परेरा नगराध्यक्ष होते त्याच कार्यकाळात दिगंबर कामत गटातील दीपाली सावळ या उपनगराध्यक्षा होत्या. आता दिगंबर कामत यांच्या गटाला नगराध्यक्ष पदाची संधी मिळणार आहे. उपनगराध्यक्ष पदावर गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. संधी मिळणार नसल्याने काही जण नाराज झाले आहे. या गटाचे नेतृत्व दिगंबर कामत गटातील काही असंतुष्ट नगरसेवक करत असल्याचे ही समोर आले आहे.

नगरसेवकांच्या छुप्या बैठकांना वेग आला आहे. नुकतेच मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांनी चार ते पाच नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहे असा दावा केला होता. तुर्तात महात्मे यांनी केलेल्या दावा अजून सत्यात उतरला नसला तरीही माहितीनुसार नगरसेवक फुटण्याच्या तयारीत आहेत. असे घडल्यास पालिकेचा नगराध्यक्ष भाजप गटातील असू शकतो. पालिकेवर भाजपचे 7 नगरसेवक निवडून आले होते, त्यात फॉरवर्डच्या श्वेता लोटलीकर आणि तृणमूलचे उमेदवार महेश आमोणकर यांची भर पडली आहे. फातोर्डा फॉरवर्डकडे 8 आणि दिगंबर कामतच्या मॉडेल मडगाव गटाकडे 7 नगरसेवकांचे बळ आहे. ज्येष्ठ नगरसेवक घनश्याम शिरोडकर हे पूर्वी दिगंबर कामत च्या गटात होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी कामत यांच्यापासून फारकत घेतली. सध्या ते तटस्थ असले तरीही, त्यांचा ही कल भाजपच्या गटाकडे असल्याचे समजते. लिंडन परेरा यांना आणखीन काही दिवसांचा अवधी हवा असल्याची मागणी त्यांनी विजय सरदेसाई यांच्याकडे केली होती. पण विजय सरदेसाई यांनी ती मागणी फेटाळून लावताना अलिखित करारानुसाराच पालिकेवर सत्ता स्थापन होईल असा स्पष्टच इशारा त्यांना दिला होता.

गोवा फॉरवर्डमध्ये घुसमट : श्वेता

नगरसेविका श्वेता लोटलीकर म्हणाल्या, आपण फातोर्डा फॉरवर्ड गटातून निवडून आले तरीही गटात होणारे निर्णय आपल्याला विश्वासात न घेताच घेतले जात होते. निवडून आल्यानंतर आपल्याला बाजूला टाकल्यासमान वागणूक फॉरवर्डच्या नगरसेवकांकडून मिळत होती. सरदेसाईंनीही याची दखल घेतली नाही. स्थायी समिती व बाजार समितीची निवड करताना देखील आपला समावेश केला नाही. एकंदरीत फॉरवर्ड पक्षात राहून आपली घुसमट होत असल्याने मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. भाजपात आता नव्याने कोणकोणते नगरसेवक प्रवेश घेणार हे आपल्याला माहीत नाही. मात्र आमदार दिगंबर कामत यांनी भाजपात प्रवेश घेतल्यास मॉडेल मडगाव गटातील सर्व नगरसेवक भाजपात आल्यासारखे होईल.

घनश्याम शिरोडकर म्हणतात…

नगरसेवक घनश्याम शिरोडकर म्हणाले, आपण मॉडेल मडगावमधून निवडून आलो पण जनतेच्या हितासाठी काम करण्यास मॉडेल मडगाव पक्षातून बाहेर पडलो आहे. विजय सरदेसाई व दिगंबर कामत यांच्यातील अलिखित करारानुसार आता दिगंबर कामत गटाकडे नगराध्यक्ष पद जाणार आहे. यासाठी नगरसेवक दामू शिरोडकर व नगरसेवक सगुण नायक हे धडपडत असल्याचे दिसते. आता चार किंवा पाच नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यास दिगंबर कामत यांना भाजपामध्ये प्रवेश करण्यास वाट ही मोकळी होणार आहे.

Back to top button