गोवा : सिद्धी नाईक प्रकरण ‘सीबीआय’कडे द्या - तारा केरकर

पणजी; पुढारी वृत्तसेवा : सिद्धी नाईक प्रकरणात तपास करण्यात गोवा पोलिस अपयशी ठरले असून, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी गुरुवारी केली. पणजी येथील आझाद मैदानात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. प्रसंगी पुन्हा न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सिद्धीचे वडील संदीप नाईक हेही उपस्थित होते.
.त्या म्हणाल्या, सिद्धी नाईक प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. पोलिस म्हणतात तिच्या मृतदेहावरील
कपडे वाहून गेले. तिने घट्ट कपडे घातले होते ते वाहून कसे जातील ? एकवेळ हे मान्य केले तरी तिच्या डोक्यावरील केस बांधायचा क्लच तसाच कसा उरला ? मृतदेह पाण्यात होता तर तो घट्ट का झाला नाही ? तिचा मोबाईल अजूनही पालकांच्या ताब्यात का दिलेला नाही? शवविच्छेदन सिसिटीव्ही कॅमेरा असणार्या खोलीत का केले नाही ?
त्या म्हणाल्या, गोवा पोलिसांनी राजकीय दबावामुळे या प्रकरणाचा योग्य तपास केला नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे आता पुरावे नाहीत. आम्ही तसेच तिच्या वडिलांनी पत्र लिहून सर्व काही स्पष्ट केले होते. पोलिसांनी त्याचाही आधार घेतला असता तर सबळ पुरावे सापडले असते. याप्रकरणी एका पोलिस निरीक्षकाला निलंबित करून उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्याला तपास दिला होता. मात्र, त्यानेही योग्य तपास केला नाही. त्याने सिद्धीच्या वडिलांदेखील चौकशीसाठी बोलावले नाही.
पोलिसांचा हलगर्जीपणा : नाईक
संदीप नाईक यांनी आरोप केला की, एका अर्थाने कळंगुट पोलिसांनीच माझ्या मुलीला मारले आहे. पोलिस उपनिरीक्षक विभा, प्रगती, एल्विस व निरीक्षक रापोस यांना सिद्धी नेमकी कशी मृत झाली हे माहिती आहे; मात्र त्यांनी ते लपवून ठेवले. गुन्हा अन्वेषनचे उपअधीक्षक राजू राऊत-देसाई यांनीही योग्य तपास केला नाही.