गोवा : स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा - आ. संकल्प आमोणकर | पुढारी

गोवा : स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा - आ. संकल्प आमोणकर

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  स्मृती इराणी कुटुंबीयांच्या गोव्यातील व्यवसायाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

आमोणकर यांनी पत्रात लिहले आहे की, आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केलेल्या तक्रारीबाबत राज्यातील विविध विभाग ‘सिली सोल कॅफे आणि बार’ची चौकशी करत आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्राद्वारे, कंपनीच्या नोंदणीची कागदपत्रे आणि जीएसटीच्या तपशिलांवरून हे सिद्ध होते की ते रेस्टॉरंट त्यांचे कुटुंबच चालवते.

या प्रकरणात निदर्शनास आणलेल्या गोष्टींमध्ये बेकायदेशीरपणे दारू परवाना जारी करणे आणि उपाहारगृहाचे बेकायदेशीर बांधकाम यांचा समावेश आहे. हा सगळा कारभार बेनामी पद्धतीने चालवला जात असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे आणि ही मालमत्ताही बेनामी म्हणून ताब्यात घेतली असण्याची दाट शक्यता आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे स्मृती इराणी आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्री आणि अधिकार्‍यांवर प्रचंड दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आपण मोदींना पत्र लिहून विचारले आहे की मंत्री विश्‍वजित राणे यांनी इराणी या त्यांच्या बॉस असल्याचे सांगितले आहे. असे असताना त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करू शकतो? असा प्रश्‍नही त्यांनी केला.

Back to top button