गोवा : सत्तेसाठी पंचांची शर्यत, आमदारांची कसरत; सरपंच-उपसरपंच निवड 22 रोजी | पुढारी

गोवा : सत्तेसाठी पंचांची शर्यत, आमदारांची कसरत; सरपंच-उपसरपंच निवड 22 रोजी

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता पंचायतींचे सरपंच व उपसरपंच ठरवण्यासाठी 22 ऑगस्ट रोजी पंचायत कार्यालयात बैठका होणार आहेत. पंचायत खात्याने तशी अधिसूचना काढलेली आहे. त्यामुळे नवीन निवडून आलेल्या पंचांमध्ये सरपंच व उपसरपंच होण्यासाठी सध्या स्पर्धा सुरू झाली असून, स्थानिक मंत्री वा आमदारांना अनेक इच्छुकांतून दोघांची निवड करण्याची कसरत करावी लागत आहे.

बहुतांश ठिकाणी स्थानिक आमदारांच्या आदेशानुसार सरपंच व उपसरपंच ठरणार असलेे तरी ज्या जागी कुठलाच पॅनेलला बहुमत मिळालेले नाही, त्या पंचायतीत अपक्ष निवडून आलेल्या पंचांना सरपंच किंवा उपसरपंच होण्याची संधी चालून आली आहे. काही ठिकाणी तडजोडीचे राजकारण सुरू झाले असून, पाच वर्षे पाच सरपंच, असे यापूर्वी घडलेले प्रकार अंमलात येणार आहेत.

एकूणच सद्या नव्या पंचांना बरेच महत्त्व आले असून, बहुतांश पंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात निवडून आलेले असल्याने त्यांच्यातही पहिल्यांदा सरपंच पद किंवा उपसरपंचपद मिळावे यासाठी स्पर्धा सुरू आहे. राज्यातील 62 पंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे तर 64 पंचायतींत उपसरपंचपद महिलांना राखीव आहे. ज्या ठिकाणी महिलांना सरपंचपद राखीव आहे, त्या पंचायतीत जे पुरुष वारंवार निवडून येऊन सरपंच होतात, त्यांची गोची झाली आहे. त्यांना उपसरपंचपद स्वीकारावे लागणार आहे. बहुतांश पंचायतीत नवे चेहरे निवडून आलेले असल्याने जो माजी पंच निवडून आला आहे, त्यांच्या इशार्‍यावरच तेथील पंचायती चालणार आहेत.

Back to top button