गोवा : भ्रष्टाचारमुक्‍त प्रशासन द्या : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत | पुढारी

गोवा : भ्रष्टाचारमुक्‍त प्रशासन द्या : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : पंचायतींनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या मुद्यावर काम करावे. तसे केले तरच राज्याचा विकास जलदरीत्या होणार आहे. यापूर्वीच्या पंचायत मंडळांनी आत्मनिर्भर भारत तसेच स्वयंपूर्ण गोवा योजनेसाठी सरकारला उत्तम पाठिंबा दिला. पुढेही पंचायतींनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मडगावात आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काही पंचायती नाहक लोकांची कामे अडवतात, असे ऐकू येते. प्रामुख्याने किनारपट्टी भागांत असे होत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येतात. विनंती करूनही काही पंचायती लोकांना त्रास देत असून ते योग्य नाही. पंचायतीने असे करू नये. त्याऐवजी लोकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील सुमारे 150 पंचायती भाजप सरकारच्याच आहे. या सर्व पंचायती स्वतः पुढे येऊन आम्हाला भाजपचा पाठिंबा आहे असे सांगतील, तेव्हा सर्वाना ते दिसून येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पंचायतीच्या अधिकाराबाबत मुख्यमंत्री म्हणाले, पंचायतीकडे आहेत तेवढे अधिकारी अन्य कुणाकडे नाहीत. एका ठिकाणी सरकारतर्फे उभारण्यात आलेले शौचालय पंचायतीने अडविल्याची घटना यापूर्वी घडलेली आहे. यावरून पंचायतीचे अधिकार सर्वानी लक्षात घ्यावे. सरकार पंचायतीच्या अधिकारावर वरचढ करत नाहीत तर पंचायतींनी विनंती केल्यावर पंचायत संचालनालय त्यानुसार कार्यवाही करते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Back to top button