गोवा : साळावली धरणावर ड्रोनने चित्रीकरण, दोघे पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

गोवा : साळावली धरणावर ड्रोनने चित्रीकरण, दोघे पोलिसांच्या ताब्यात

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  सुरक्षेच्या कारणास्तव साळावली धरणावर चित्रीकरण करण्यास मनाई केली असताना रविवारी दोघा पर्यटकांनी धरणावर ड्रोन उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. ते दोघे पर्यटक म्हणून धरणावर आले होते. त्यांनी झुडपात थांबून धरणावर ड्रोन सोडला होता. हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांना ड्रोनसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

गेल्या चार दिवसांपासून राज्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. साळावली धरणावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने पर्यटक सळावली धरणाला भेट देत आहेत. रविवारी हजारो पर्यटक धरणावर दाखल झाले होते. ओसंडून वाहणार्‍या पाण्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी अतुरलेले पर्यटक धोका पत्करू लागल्याने त्यांच्यावर नियंत्रण आणताना सुरक्षा रक्षकांची धावपळ होत होती.
सकाळी पर्यटकांची गर्दी वाढलेली असताना अचानक सुरक्षा रक्षकांना धरणावर ड्रोन असल्याचे दिसून आले. त्यांनी ड्रोनचा पाठलाग केला असता एकजण झाडीत थांबून ड्रोन हाताळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या व्यक्‍तीला पकडून वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत माहिती देण्यात आली. या घटनेनंतर सायंकाळी त्याच पद्धतीने पुन्हा ड्रोन सोडण्यात आला. सुरक्षा रक्षकांना हा प्रकार समजताच त्यांनी शोध मोहीम राबवून एका व्यक्‍तीला ताब्यात घेतले.

त्या दोघा पर्यटकांना ड्रोन कॅमेर्‍यासह सांगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती इच्छित फळदेसाई यांनी दिली आहे. साळावली धरणावर चित्रीकरण करण्यास मनाई आहे. पर्यटकांनी सर्वांच्या सुरक्षेसाठी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन फळदेसाई यांनी केले आहे.

धरणावर साडेचार हजार पर्यटक
दिवसभरात साळावली धरणावर साडेचार हजार पर्यटकांनी भेट दिली. ओसंडून वाहणार्‍या पाण्याचे द‍ृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. सायंकाळी सहानंतर धरणावर मोफत प्रवेश दिला जातो. त्यामुळे सायंकाळनंतर पर्यटकांची संख्या वाढते. पुढील तीस दिवस ही विद्युत रोषणाई पाहता येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

Back to top button