गोवा : संचालक नाईक बनले बळीचा बकरा | पुढारी

गोवा : संचालक नाईक बनले बळीचा बकरा

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  तूरडाळ आणि साखर खराब झाल्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री आणि नागरी पुरवठा मंत्री दोषी आहेत; पण लोकांची दिशाभूल करण्यासाठी तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक यांचे निलंबन केले, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला. याप्रकरणी केंद्र सरकारने स्वतंत्र केंद्रीय यंत्रणेतर्फे चौकशी करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केल्याचे त्यांनी सांगितले.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत सरदेसाई यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, गोव्यात करोडो रुपयांची तूरडाळ आणि लाखो रुपयांची साखर खराब झाली. त्याला खरे तर त्या वेळचे मुख्यमंत्री आणि त्या वेळचे नागरी पुरवठा खात्याचे मंत्री दोषी आहेत. कारण मंत्रिमंडळात त्यांनी डाळ खरेदीचा ठराव घेतला होता. मात्र लोकांची दिशाभूल करण्यासाठी तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक यांचे निलंबन सरकारने शुक्रवारी केले आहे. हा लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचा प्रयत्न असल्याचे सरदेसाई यावेळी
म्हणाले.

केंद्रीय स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी झाली तरच या प्रकारामध्ये खरे दोषी कोण ते कळतील, असे सांगून सिद्धिविनायक नाईक यांना कुठलीही चौैकशी न करता निलंबीत करून त्यांना बळीचा बकरा करण्यात आल्याचा दावा सरदेसाई यांनी यावेळी केला. याप्रकरणी त्यावेळचे नागरी पुरवठा खात्याचे मंत्री व मुख्यमंत्री यांची चौकशी व्हायला हवी, अशा आमची मागणी असल्याने आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

धान्य वितरणाच्या प्रकरणी गोवा राज्य हे सर्व राज्याच्या शेवटच्या क्रमांकावर असल्याचा एका एजन्सीचा अहवाल आहे. धान्य वितरण योग्य प्रकारे करण्यात नागरी पुरवठा खाते अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे डबल इंजिन सरकारचा वारंवार उल्लेख करतात. केंद्रातील इंजिन चांगले चालले असताना गोव्यातील इंजिन मात्र बिघडले आहे. विद्यमान सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघातील पंचायती त्यांच्या हातून गेल्याचा दावा करून निवडून आलेल्या पंचांना आमिषे दाखवून आपल्याकडे ते ओढत असल्याचा दावा यावेळी सरदेसाई यांनी केला.

काँग्रेसचे आमदार इधर-उधर
काँग्रेसच्या 11 आमदारांपैकी अर्धे आमदार हे पक्षासोबत नाहीत. त्यामुळे पंचायत निवडणुकीत ते सक्रिय राहिलेे नाहीत. हे नाराज आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहेत. यापूर्वीही काँग्रेसने भाजपला आमदार पुरवले आहेत. तसेच प्रवक्‍ते पुरवलेले आहेत. काँग्रेसचे पूर्वीचे प्रवक्‍ते आता भाजपाचे प्रवक्‍ते झालेत. मात्र त्यातील काहीजण निवडणुकीत पराभूत झाल्याचे सांगून भाजपने प्रवक्त्यांना निवडणुकीत उतरू नये, असा सल्ला यावेळी सरदेसाई यांनी दिला.

Back to top button