गोवा : मुरगावात सातपैकी चार पंचायती भाजपकडे | पुढारी

गोवा : मुरगावात सातपैकी चार पंचायती भाजपकडे

वास्को; पुढारी वृत्तसेवा :  मुरगाव तालुक्यातील काही पंचायतीतून प्रस्थापितांना मोठा दणका मिळाला. मतदारांनी नवीन चेहर्‍यांना पसंती दिली. कासावली, वेळसाव, केळोशी पंचायतीमध्ये काही प्रकल्पांविरोधात मतदान झाल्याचे दिसून येते. बोगमाळो व चिखली पंचायतीवर माविन गुदिन्हो समर्थक निवडून आले. मात्र सांकवाळच्या बाबतीत वेगळे चित्र दिसते. तेथे सर्वजण आम्ही भाजप समर्थक असल्याचे सांगतात. परंतू या पंचायतीचे नियंत्रण आपल्या हाती राहावे, यासाठी काही प्रस्थापित प्रयत्नशील आहेत.  कुठ्ठाळी पंचायतीतून निवडून आलेल्यांमध्ये आमदार अँथोनी वाझ यांच्या समर्थकांची संख्या अधिक आहे. परंतु या पंचायतीमध्ये भाजपसमर्थक सरपंच व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकंदर डावपेच पाहता सातपैकी चार पंचायती भाजपच्या ताब्यात जाणार आहे.

केळोशी पंचायतीतून सातही उमेदवार नव्या चेहर्‍याचे आहेत. त्यांना मिनी इंडिया प्रकल्पाला विरोध करणार्‍यांनी निवडून आणले आहेत. मिनी इंडिया प्रकल्प गावात नको, यासाठी गावकरी गेल्या काही वर्षांपासून सतत विरोध करीत आहेत.त्यामुळे यावेळी त्यांनी आपल्या सर्व समर्थकांना निवडून आणण्याची किमया केली आहे. वेळसांवमध्ये माजी पंच रुकाझिनो डिसोझा यांनी आपले पाच समर्थक उभे केले होते. मात्र गोयकारांचो एकवोटसमोर ते टिकले नाहीत. गोंयकारांचो एकवोटचे सातपैकी पाचजण निवडून आले आहेत. गोयकारांचे एकवोटचा दुपदरी रेलमार्गला विरोध आहे. कासावलीमध्येही अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. माजी सरपंच जुझे मारिया फुर्तादो यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे ठरविले आहे. कोळसा व दुपदरी रेलमार्गला आमचा विरोध असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

चिखली, सांकवाळ, कुठ्ठाळी, बोगमाळो येथे कोणत्याही प्रकल्पांचा प्रश्न नव्हता. तेथील निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवर लढविली गेली. बोगमाळोमध्ये मावळत्या सरपंच लोरेना कुन्हा, मावळते उपसरपंच संकल्प महाले, मावळते पंच अरुण नाईक हे पुन्हा निवडून आले. तर इतर हे नवखे आहेत. या पंचायतीमध्ये संकल्प महाले हे दुसर्‍यांदा तर अरुण नाईक हे तिसर्‍यांदा जिंकून आल्याने त्यापैकी एकाचा सरपंचपदावर दावा असेल.

कुठ्ठाळीमध्ये सेनिया परेरा, ईदोसियना रॉड्रिग्ज वगळता इतर नवीन चेहरे आहेत. पंचायतीमध्ये कोणीही विरोधी असणार नाही. आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करणार असल्याचे सेनिया परेरा यांनी सांगितले. या पंचायतीवर आमदार वाझ यांनी आपले समर्थक निवडून आणले आहेत. परंतू भाजपसमर्थक असलेल्या दोघी निवडून आल्या आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना सरपंचपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.तथापी सेनिया परेरा या सरपंचपदासाठी अधिक इच्छुक आहेत. त्यांनी माजी उपसरपंच रेमंड डिसा यांना चांगली टक्कर देऊन पराभूत केले.

चिखली पंचायतीमध्ये अकरापैकी सातजण मंत्री गुदिन्हो यांच्या गटातील आहेत. मावळते उपसरपंच कमलाप्रसाद यांनी आपल्या पॅनेलमधील चारपैकी चारही उमेदवार निवडून आणले. त्यामुळे सरपंचपदावर त्यांचा दावा असेल यात वाद नाही. माजी सरपंच मारी मास्कारेन्हस, माजी सरपंच शिकेत उर्फ फ्रान्सिस्को नुनीज, रोमन वाझ हे विरोधी गटातील आहेत.

सांकवाळ पंचायतीमध्ये माजी सरपंच गिरीश पिल्ले हे एकूण 1577 मतांपैकी 1065 मते घेऊन निवडून आले. त्यांनी आपला प्रतिस्पर्धी अरविंद अक्की यांना 646 मतांनी पराभूत करून गोव्यात एक विक्रम रचला. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून उभे राहिले होते. या निडणुकीत माजी पंच गोविंद लमाणी यांनी आपली पत्नी अनुशा लमाणी यांना जिंकून आणले. तर माजी पंच आरिफ कादर हे पराभूत झाले असले तरी त्यांनी आपली बहीण जसिया कादर यांना जिंकून आणले. गिरीश पिल्ले यांनी या पंचायतीमध्ये आपले समर्थक सरपंचपदी असावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्याकडे सध्या अकरापैकी चारजणांचे संख्याबळ आहे.

मातब्बर पराभूत
या निवडणुकीत काही मातब्बर उमेदवार पराभूत झाले. त्यांना आपल्या पराभवाची कुणकुण अगोदरच लागल्याने काहीजण मतमोजणी केंद्राकडे फिरकलेच नाही. नवीन चेहरे मात्र पाणी, वीज, रस्ते, कचरा याविषयीच बोलताना दिसले. प्रत्येक वेळी हेच प्रश्न चर्चिले जातात. फक्त चेहरे दुसरे असतात.

Back to top button