गोवा : सांगे मतदारसंघात सरपंच निवडीचा पेच | पुढारी

गोवा : सांगे मतदारसंघात सरपंच निवडीचा पेच

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  पंचायत निवडणुकीत सांगे मतदारसंघात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असले, परंतु पंचायतींवर सरपंच आणि उपसरपंच निवडीचे मोठे आव्हान आता उभे राहिले आहे. रिवण पंचायतीच्या सरपंचपदावर सुमित्रा नाईक आणि वैशाली नाईक या भाजपाच्या दोन पंच सदस्यांनी दावा केला आहे. मळकर्णे पंचायत सरपंचपदावर राजेश गावाकर, महिलांसाठी राखीव असलेल्या उगे पंचायतीवर भारती नाईक, भाटी पंचायतीवर चंद्रकांत गावकर, वाडे कुर्डी पंचायतीवर रजनी गावकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. फळदेसाई यांचा मूळ गाव असलेल्या कावरे पिर्ला पंचायतीवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अनपेक्षित घडामोडीत फळदेसाई यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आणि नेत्रावळी पंचायतीवर निवडून आलेल्या राखी प्रभूदेसाई यांनी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याशी हातमिळवणी केली आहे. सांगे मतदारसंघाच्या सातही पंचायतींवर प्रस्थापित निवडून आले आहेत. काही ठिकाणी ज्येष्ठतेच्या आधारावर सरपंचपदावर दावा केला जाऊ लागल्याने सरपंचपदासाठी एका पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक निर्माण झाले आहेत.
रिवण पंचायतीवर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

स्थानिक आमदार सुभाष फळदेसाई यांच्या पॅनलमधील पाचजण निवडून आले आहे. रिवण पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. सत्ताधारी पॅनलमधील सुमित्रा नाईक आणि सलग चारवेळा निवडून आलेल्या वैशाली नाईक यांनी सरपंचपदावर दावा केला आहे. नऊपैंकी पाचजण भाजपच्या बाजूने असले तरीही दोघेजण सरपंचपदासाठी इच्छुक असल्याने त्यातील एकाला पाच पंचसदस्यांचे पाठबळ मिळवावे लागणार आहे. ज्येष्ठतेनुसार वैशाली नाईक यांचे पारडे जड असले तरीही माजी सरपंच सूर्या नाईक यांनी स्वतःबरोबर आपल्या आईलाही निवडून आणले आहे. त्यामुळे त्यांचेही वजन वाढलेले आहे. इच्छुकांनी बाहेरच्या पंचसदस्यांचे पाठबळ घेण्याची तयारी सुरू केली असून, एका इच्छुकाच्या हाती आरजीचा उमेदवार लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी बहुमत सिद्ध करा आणि सरपंच व्हा, असे सांगितल्याचे समजते.

मळकर्णेत राजेश गावकर यांची वर्णी शक्य
विरोधकांनी सर्वात जास्त लक्ष सांगे मतदारसंघाचा भाग असलेल्या आणि केपे तालुक्यात येणार्‍या मळकर्णे पंचायतीकडे केंद्रित केले होते. सुभाष फळदेसाई यांचे कट्टर समर्थक असलेले राजेश गावकर यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली होती. पण तो डाव यशस्वी होऊ शकला नाही. मळकर्णे पंचायतीच्या सरपंचपदावर राजेश गावकर यांची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button