गोवा : मोप विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्यावे | पुढारी

गोवा : मोप विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्यावे

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा :  गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी मोप विमानतळ नामकरण समितीने केली आहे. शनिवारी येथे पत्रकार परिषदेत त्यांनी या मागणीसंदर्भातील भूमिका मांडली.

यावेळी समितीचे निमंत्रक सुभाष केरकर, संघटक दीपेश नाईक, बोडगेश्‍वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे, खजिनदार प्रशांत शेट, कृष्णा गावकर व रामदास मोरज उपस्थित होते. गोव्याचा सर्वांगीण विकास करीत बहुजन समाजातील लोकांचा उत्कर्ष व्हावा, बहुजन समाज ताठ मानेने जगावा, सुशिक्षित व्हावा म्हणून भाऊसाहेब बांदोडकर यांनी आयुष्य वेचले. त्यामुळे त्यांना जनतेच्या मनामनांमध्ये मानाचे स्थान आहे, असे या समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

यावेळी सुभाष केरकर म्हणाले की, गेल्या वर्षी मोपा विमानतळावर आम्ही लावलेले फलक दोन महिन्यांनी काढून टाकण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आम्ही स्वातंत्र्यदिनी रीतसर मागणी पत्रादेवी येथे करणार आहोत.
यावेळी संजय बर्डे म्हणाले स्व. भाऊसाहेबांची 49 वी पुण्यतिथी आहे. पेडणेच्या मांद्रे मतदारसंघातून निवडून आलेले भाऊसाहेब बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कुळ मुंडकारांना खूप दिलासा दिला. त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेच पाहिजे. म. गो चे नेते सुदिन ढवळीकर यांनी ही मागणी उचलून धरावी आणि मुख्यमंत्र्यांना पटवून द्यावे.

दिल्‍लीला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आले आहे. तसेच मोपा शेतकर्‍यांच्या जमिनीवर उभारलेल्या विमानतळाला स्व. भाऊसाहेबांचे नाव देऊन या शेतकरी, कष्टकरी लोकांचे समाधान सरकारने करावे, असे आवाहन दीपेश नाईक यांनी केले. कृष्णा गांवकर व रामदास मोरजे यांनीही आपापली मते मांडली. सरकारने तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास काय कराल? या प्रश्‍नाला ते म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाऊंचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ राहणार नाही.

Back to top button