गोवा : लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपलाच : मुख्यमंत्री | पुढारी

गोवा : लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपलाच : मुख्यमंत्री

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  ग्राम पंचायत निवडणुकीच्या इतिहासात यंदा भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. यामुळे लोकांनी भाजपवर ठेवलेला विश्‍वास दिसून येतो. या निकालामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप दोन्ही जागा जिंकणार हे निश्चित झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, 186 पैकी 140 ते 150 जागांवर भाजपचे सरपंच निवडून आले आहेत. उर्वरित पंच सदस्यांपैकी पन्नास टक्के हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. जनतेने भाजपवर दाखवलेल्या विश्वासबद्दल मी त्यांचा आभारी आहे. निकालामुळे भाजप ग्रामीण भागात घट्टपणे रुजला आहे हे समजून येते.
आमचे सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करणार आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा 2.0 ही योजना देखील आणखीन प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. आम्ही कुणासोबतही भेदभाव न करता सर्वांची कामे करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या कामाला दिलेली ही पावती असल्याचे ते म्हणाले.

900 पंच भाजपचे
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, 800 ते 900 उमेदवार हे भाजपचे समर्थक आहेत. काँग्रेस आमदार एल्टॉन डिकोस्ता यांच्या भावाचा पराभव होणे व आमदार मायकल लोबो यांच्याकडील कळंगुट पंचायत भाजपकडे येणे ही भाजपसाठी मोठी बाब आहे. आमच्या आमदार, मंत्र्यांनी आणि सरकारनेही चांगले काम केल्याने हा विजय मिळाला आहे.

Back to top button