गोवा : खराब तूरडाळ, साखर भोवली; सिद्धिविनायक नाईक निलंबित | पुढारी

गोवा : खराब तूरडाळ, साखर भोवली; सिद्धिविनायक नाईक निलंबित

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  नागरी पुरवठा खात्याचे तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक यांना करोडो रुपयांची तूरडाळ खराब होण्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. शुक्रवारी सरकारने हा निर्णय घेतला.

सिद्धिविनायक नाईक हे सध्या समाज कल्याण खात्याचे संचालक होते. कोरोना काळात राज्यातील नागरिकांना 83 रुपये किलो दराने प्रती रेशनकार्डवर एक किलो तूरडाळ देण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयाची तूरडाळ नागरी पुरवठा खात्याने खरेदी करण्यात आली होती. त्यातील काही तूरडाळ वितरित केली गेली मात्र सुमारे 2.7 कोटी रुपयाची डाळ वितरित न केल्याने ती खराब झाली. सदर तूरडाळीची खरेदी 79 रुपये प्रती किलो दराने करण्यात आली होती. तसेच सुमारे 5 लाख रुपये किमतीची साखरही खराब झाली होती.

खराब झालेली तूरडाळ व साखर घाऊक दराने विकण्यासाठी नागरी पुरवठा खात्याने निविदा काढल्यामुळे हा प्रकार उघड झाला. माजी नागरी पुरवठा मंत्री व विद्यमान क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी केली होती. त्यानंतर सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केली. यात सिद्धिविनायक नाईक यांना जबाबदार धरले गेले.

Back to top button