गोवा : सत्तरीतील 101 पैकी 40 शाळा बंद होणार? | पुढारी

गोवा : सत्तरीतील 101 पैकी 40 शाळा बंद होणार?

वळपई; पुढारी वृत्तसेवा :  केंद्र सरकारच्या नीती आयोगानुसार 15 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करून परिसरातील अन्य शाळेमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला आहे. याचा सत्तरी तालुक्याला मोठा फटका बसणार आहे. तालुक्यात 101 पैकी 40 शाळा बंद होण्याची भीती आहे.

राज्य सरकारने नीती आयोगानुसार शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसे झाल्यास तालुक्यातील 40 प्राथमिक शाळा बंद होऊन त्या जवळच्या शाळेत विलीन होणार आहेत. त्याला तालुक्याच्या अनेक भागातून विरोध होऊ लागला आहे. या शाळा बंद झाल्यास ग्रामीण भागातील सांस्कृतिक व सामाजिक चळवळीला मोठ्या प्रमाणात धक्का बसण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली.

पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी सत्तरी तालुक्याच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शाळा सुरू केल्या. या शाळांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिह राणे यांचे योगदान दिले. त्यांनी ग्रामीण भागात रस्ते व विजेची सोय उपलब्ध करून या शाळांना सुविधा निर्माण करून दिल्या. सत्तरी तालुक्यातील 101 शाळा पैकी 40 शाळांमध्ये 15 पेक्षा कमी मुले आहेत. यामुळे सरकारच्या या नवीन धोरणानुसार या शाळा बंद होण्याची शक्यता आहे. या संदर्भाची पत्र वाळपई भागशिक्षणधिकारी कार्यालयातून संबंधित शाळांना पाठविण्यात आलेली आहेत. यामुळे सध्यातरी पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पालकांचा विरोध
अनेक पालक शिक्षक संघाने या संदर्भात भाग शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन सादर केले आहेत. शाळा स्थलांतरित करण्यात आपला तीव्र विरोध प्रकट केलेला आहे. अनेक शाळांमध्ये पालक शिक्षक संघाच्या बैठका घेऊन विरोध करण्यात येत आहे.

Back to top button