गोवा : बैलपार नदीला पूर, बागायती धोक्यात | पुढारी

गोवा : बैलपार नदीला पूर, बागायती धोक्यात

पेडणे; पुढारी वृत्तसेवा :  बैलपार नदीला रविवारी पुन्हा एकदा पूर आल्याने मोठ्या प्रमाणात शेती बागायती पाण्याखाली गेली आहे.

 पूर असाच राहिला तर शेजारील वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. सरकारला वारंवार सांगूनही बैलपार नदीवर बंधार्‍यात असलेले लाकडाचे ओंडके न काढल्याने ही पूरस्थिती निर्माण झाल्याची टीका काँग्रेसचे नेते अ‍ॅड. जितेंद्र गावकर, शेतकरी उदय महाले आदींनी केली.

जलसिंचन खात्याने बैल पार नदीच्या पात्राच्या शेजारी कुणीही मागणी न करता 27 कोटी रुपयाचा पंपहाऊस प्रकल्प उभारण्याचा कामाला जोर दिलेला आहे. हे बांधकाम नदीच्या पात्राच्या काही अंतरावरच सुरू असून नदीत मातीचा भराव टाकल्यामुळे अर्धाअधिक पंप हाऊस पाण्याखाली गेले आहे. शिवाय नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलून परिसरातील शेती व बागायती शिरले आहे.

याविषयी काँग्रेसचे नेते तथा वकील जितेंद्र गावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की जलसिंचन खात्याने जो पंप हाऊस प्रकल्प उभारलेला आहे. त्याला नियोजन असताना किंवा सरकारकडे कोणीही या ठिकाणी पंप हाऊस बांधावा अशी मागणी केली नव्हती. तरीही सरकारने या ठिकाणी पंप हाऊस उभारलेला आहे. या पंप हाऊसमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह बदलून सध्या शेती बागायती पाणी शिरलेला आहे. जर या पाण्याचा प्रवाह असाच राहिला तर मुख्य रस्त्यावरून पाणी वाहून लोकवस्तीत घुसण्याचेची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Back to top button