गोवा : केपेतील पंचायतींवर वर्चस्व कोणाचे?

गोवा : केपेतील पंचायतींवर वर्चस्व कोणाचे?
Published on
Updated on

कुंकळ्ळी; पुढारी वृत्तसेवा :  पंचायत निवडणुकीला अवघेच दिवस बाकी असून केपे मतदारसंघातील पंचायतीवर वर्चस्व स्थापण्यासाठी भाजप समर्थक व काँग्रेस समर्थकांत रस्सीखेस सुरू आहे. माजी आमदार बाबू कवळेकर समर्थक पंचायतीवर सत्ता स्थापणार की विद्यमान आमदार पंचायतीवर राज्य करणार यावरून गावागावात पैजा लावल्या जात आहेत. केपे तालुक्यातील आंबावली पंचायत व बाळळी पंचायतीचे काही प्रभाग कुंकळ्ळी मतदारसंघात येत असल्याने ही निवडणूक कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव व माजी आमदार क्लाफास डायस यांच्या साठी प्रतिष्ठेची बनली आहे.

केपे मतदारसंघातील बासे, मोरपिल्ला, फातर्पा, बेतुल, खोला, अवडे या पंचायती बरोबरच कुंकळ्ळी मतदारसंघातील आंबावली व बाळ्ळी पंचायतीवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी अनुभवी माजी पच व सरपंचाच्या आसनाला सुरुंग लावून नवीन बदल आणण्यासाठी नवीन चेहरेही निवडणुकीत उतरले आहेत.

एकेकाळी स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले बाळ्ळी पंचायतीचे माजी सरपंच रोहिदास नाईक व त्यांच्या पत्नी पुन्हा एकदा पंचायत निवडणुकीत उतरले आहेत. माजी जिल्हा पंचायत सदस्य व सक्रिय राजकारणातून दार होऊन सहकारी बँक व्यवसायात उतरलेले माजी झेडपी प्रकाश वेळीप पुन्हा एकदा पंचायत निवडणुकीत उतरले आहेत. माजी झेडपी कृष्णा वेळीप बाबू कवळेकरांच्या उमवाराला आव्हान देण्यासाठी पुन्हा रिंगणात उतरले आहेत. बासे पंचायतीचे माजी सरपंच अर्जुन वेळीप पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. भाजपाच्या एसटी मंडळाचे प्रमुख प्रभाकर गावकर सक्रिय राजकारणात उतरले आहेत.

फातर्पा पंचायतीचे माजी सरपंच व आमदार एल्टन डिकोस्टा याचे बंधू सांजिल डिकोस्टा भाजपाच्या मेदीनी नाईक यांच्या विरोधात लढत देत आहेत. याच पंचायतीच्या एका प्रभागात बाबू कवळेकर समर्थक माजी पंच व भाजपा महिला प्रमुख शीतल नाईक, खुशाली देसाई व भाजपाचे युवा मंडळ, अध्यक्ष विराज देसाई एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. काही वर्षां पूर्वी बाळ्ळी पंचायतीवर वर्चस्व गाजविले माजी सरपंच गोविंद फळदेसाई आपल्या प्रभागातून निवडणुकीत उतरले आहेत.

बेतुल, खोला पंचायतीवर सत्तेेसाठी स्पर्धा
आमदार एल्टन डिकोस्टा, माजी आमदार बाबू कवळेकर, कुंकळ्ळीचे आमदार युरी, माजी आमदार क्लाफास डायस यांनी उघडपणे कोणत्याही उमेदवारांला पाठींबा दिला नाही. तरीही आपल्या समर्थकांना निवडून आणून पंचायतीवर वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न हे आजी व माजी आमदार करीत असल्याचे चित्र दिसत आहे. बेतुल व खोला पंचायतीवर सत्ता स्थापण्याची बाबू व एल्टन समर्थकांत स्पर्धा लागली आहे. खोला पंचायतीचे माजी सरपंच व बाबू समर्थक पंढरी प्रभुदेसाई यांच्या पुढे कडवे आव्हान निर्माण केले आहे. बेतुल व मोरपिल्ला पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असणार आहे. बाळ्ळी, बासे, मोरपिल्ला, फातर्पा, खोला या पंचायतीवर भाजप आपले वर्चस्व कायम ठेवू शकतात की काँग्रेसचे एल्टन बाजी मारणार हे निकाल नंतर कळणार आहे.

प्रस्थापित विरुद्ध नवोदित
प्रस्थापित विरुद्ध नवोदित असा सामना रंगण्याचे संकेत मिळत आहेत. काही युवा व नवोदित उमेदवारांनी प्रस्थापितांना घाम काढला असून बदल हवाय, नवी पंचायत नवे पंच या घोषणा जोर धरायला लागल्याने अनुभवी माजी पंच व सरपंचांसमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news