गोवा : नियमबाह्य वाहतुकीमुळे कोळसा पडतोय रस्त्यांवर | पुढारी

गोवा : नियमबाह्य वाहतुकीमुळे कोळसा पडतोय रस्त्यांवर

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  कोळसा वाहतुकीच्या विषयावरून दक्षिण गोव्यात वाद निर्माण झालेला असताना एपीटीतून येणार कोळसा कुडचडे आणि सावर्डेतील लोकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दरदिवशी शेकडो ट्रक एपीटीतून सांतोण सावर्डे येथील लोह प्रकल्पात येतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याने या ट्रकमधील कोळसा रस्त्यावर पडत आहे. शनिवारी पहाटे गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कोळसा पडला होता.

गेल्या महिन्यात गोवा स्पाँज कारखान्याच्या विस्तारीकरणावरून वाद निर्माण झाला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकार्‍यांनी कुडचडे रवींद्र भवनमध्ये कारखान्याच्या विस्तारीकरणाबाबत जनसुनावणी घेतली होती. यावेळी लोकांनी कोळसा वाहतूक आणि कोळशाच्या हाताळणीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. कंपनीच्या अधिकार्‍यांनी, कोळशाच्या हाताळणीवरून कोणतेही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.

हा कारखाना 18 वर्षांपासून सुरू आहे. तेथे प्रक्रियेदरम्यान निर्माण होणार्‍या काळ्या भुकटीमुळे कुडचडे पालिका क्षेत्र, सावर्डे पंचायत क्षेत्र, तसेच काले आणि कुळे पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण होत असल्याने स्थानिकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता या कारखान्यात कोळशाची वाहतूक होऊ लागली आहे. ट्रकातील कोळसा रस्त्यावर पडत असल्याने तो अपघातास निमंत्रण ठरू लागला आहे. शनिवारी सकाळी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कोळसा पडला होता. दुचाकीस्वरांना कसरत करून ये-जा करावी लागली. याप्रकरणी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी स्थानिकांनी केली आहे.

 

25 ते 30 टन मालाची केली जाते वाहतूक

याबाबत ग्रामस्थ प्रमोद नाईक यांनी सांगितले की, नियमाप्रमाणे 10 टनाच्या वर माल वाहतूक करता येत नाही. पण वास्कोतून येणारे कोळशाचे ट्रक 25 ते 30 टन कोळसा घेऊन मडगाव, केपे मार्गे कुडचडेत आणि सावर्डेत दाखल होऊ लागले आहेत. रात्री पोलिस नसल्याचा फायदा घेत ही वाहतूक केली जाते. पहाटेपर्यंत कोळशाची वाहतूक चालते. कुडचडे पोलिस या प्रकाराबाबत अनभिज्ञ आहेत.

Back to top button