गोवा : केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लॉटर्‍यांचा काळाबाजार | पुढारी

गोवा : केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या लॉटर्‍यांचा काळाबाजार

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  केवळ दीड दिवसांच्या कालावधीत तब्बल अडीच कोटी रुपयांच्या लॉटरी कुपनांची विक्री करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या केपे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची लॉटरी कुपन एकंदर किमतीपेक्षा अव्वाच्या सव्वा दारात बाजारपेठेत विक्रीला आल्याने खळबळ माजली आहे. अडीचशे रुपये प्रति कुपन अशी मूळ किंमत असलेली केपे गणेशोत्सव मंडळाचे लॉटरी कुपन आठशे रुपयांना विकले जाऊ लागले आहे.

केपेचे गणेशोत्सव मंडळ दक्षिण गोव्यात सर्वात जुने तसेच सोडत कुपनांच्या आकर्षक बक्षिसांसाठी ओळखले जाते. यंदा या मंडळाने दहा गाड्यांवर तब्बल 74 लाख रोकड तसेच उत्तेजनार्थ म्हणून अतिरिक्‍त दहा लाख रुपयांची रोकड बक्षीस स्वरूपात ठेवली आहे. गेल्या आठवड्यात धुमधडाक्यात या लॉटरी कुपनांच्या विक्रीचे दालन सुरू करण्यात आले होते. अवघ्या दीड दिवसांच्या आत मंडळाच्या अडीच कोटी रुपयांच्या एक लाख सोडत कुपनांची विक्री झाली होती. खुद्द केपेतील लोकांना या गणेशोत्सव मंडळाच्या लॉटरीचे कुपन मिळाले नव्हते. त्यामुळे बर्‍याच प्रमाणावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

या लॉटरीचे अडीचशे रुपये मूळ किंमत असलेले कुपन गुरुवारी मडगावच्या बाजारपेठेत तब्बल आठशे रुपये किमतीला विकले गेले. परप्रांतीय युवकांचा एक गट फोंडा भागातील गणेशोत्सवाच्या लॉटरीचे कुपन शहरात विकत होता. काही लोकांनी त्यांच्याजवळ केपेच्या लॉटरीची विचारणा केली असता ती लॉटरी आठशे रुपये किमतीत विक्रीला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्या लॉटर्‍या त्यांना विकायला दिलेल्या आहेत, असे सांगत असताना त्यांचा व्हिडीओ मडगावातील काही जागरूक नागरिकांनी समाजमाध्यमावर प्रसारीत केला आहे. मडगावप्रमाणे म्हापसा शहरातसुद्धा या लॉटर्‍या आठशे रुपयांना विकल्या जात आहेत.

गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणतात…
गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश नाईक यांना याबाबत विचारले असता असले प्रकार यापूर्वी कधीच घडले नाहीत. यंदा लोकांची गर्दी फार होती. रांगेत राहून लॉटरी खरेदी केलेले लोक पुन्हा रांगेत येऊन लॉटरीचे बुक खरेदी करत होते. शिवाय मोठ्या संख्येने लॉटरीचे बुक खरेदी करण्यासाठी मडगाव आणि म्हापशावरून गाडी भरून लोक आले होते, अशी माहिती त्यांनी दिली. यंदा लॉटरीच्या बुकांची विक्री करण्यासाठी एक स्वतंत्र काऊंटर तर सुट्या लॉटरीच्या विक्रीसाठी दोन काऊंटर सुरू करण्यात आले होते. तरीही स्थानिक भाविक मात्र लॉटरीपासून वंचित राहिले, असे त्यांनी मान्य केले. लॉटरीच्या विक्रीत आम्ही कोणताही घोटाळा केलेला नाही; पण लॉटरीच्या बाबतीत जो गोंधळ झाला तो अतिशय वाईट होता, असेही ते म्हणाले.

Back to top button