गोवा : मोरजीत दोन जावा आमने-सामने | पुढारी

गोवा : मोरजीत दोन जावा आमने-सामने

पेडणे; निवृत्ती शिरोडकर :  राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. या राजकारणामुळे सध्या घराघरात वातावरण बिघडून टाकलेले आहे. नात्यामध्ये बेरंग निर्माण केला जातो. याचे चित्र आपल्याला मोरजी पंचायत क्षेत्रातील निवडणुकीच्या काळात दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक दोनमधील एकाच घरातील जावा एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. तर काही प्रभागांमध्ये घराणेशाहीलाच वाव मिळावा यासाठी दीर आणि भावजय ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

पंचायत पातळीवरील निवडणुकीत राजकीय पक्षांचे चिन्ह नसले तरी या निवडणुकीत भाजपा आमदार आजी-माजी आमदार आणि समर्थकांनी आपलेच उमेदवार या पंचायत क्षेत्रामधून निवडून यावे यासाठी मोठी धावपळ सुरू केल्याचे चित्र मोरजी पंचायत क्षेत्रामधून दिसत आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये गत निवडणुकीत अमित शेटगावकर विजयी होऊन उपसरपंच झाले आणि त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसाठी काम केले होते. परंतु यंदा त्यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने अमित शेटगावकर यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला सुरेखा शेटगावकर याला रिंगणात उभे केले. तर दुसर्‍या बाजूने मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी वेगळीच खेळी करत असताना अमित शेटगावकर यांच्याविरोधात त्यांच्याच वहिनीला वंदना शेटगावकर यांना विरोधात उभे केले आहे. आमदार जित आरोलकर त्यांच्या प्रचाराला सामील झाले आहेत. हे चित्र प्रभाग क्रमांक दोन मध्ये दिसून येते. प्रभाग क्रमांक पाच मधून माजी सरपंच मंदार पोके स्वतः रिंगणात आहेत, तर प्रभाग क्रमांक नऊ मधून त्यांनी आपली भावजई सुप्रिया जयदेव पोके यांना रिंगणात उभे केले आहे.

सहा माजी पंच सदस्य रिंगणात
या निवडणुकीत मोरजी पंचायत क्षेत्रामधून तीन माजी सरपंच वैशाली शेटगावकर, मंदार पोके आणि जितेंद्र शेटगावकर हे रिंगणात आहेत. तर एकूण सहा माजी पंच सदस्य त्यात आग्नेल डिसोजा, संपदा सतीश शेटगावकर,उमेश तुकाराम गडेकर, पवन मोरजे, विलास मोरजे, सुप्रिया जयदेव पोके यांचा समावेश आहे. तर माजी पंच तुषार शेटगावकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली आहे.

प्रकाश शिरोडकर यांच्या पत्नी रिंगणात
प्रभाग क्रमांक सहा, हा ओबीसी महिलासाठी राखीव आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागामधून प्रकाश शिरोडकर विजयी झाले होते. यंदा हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे त्यांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. परंतु या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी रजनी प्रकाश शिरोडकर यांना रिंगणात उभे केले आहे.

माजी पंच सदस्यांना अन्य प्रभागांचा आधार
ज्या पद्धतीने माजी सरपंच जितेंद्र शेटगावकर यांनी आपला प्रभाग आठ सोडून प्रभाग क्रमांक एक मध्ये निवडणूक लढवत आहेत. त्याच पद्धतीने गेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून संपदा सतीश शेटगावकर या विजयी ठरलेले आहे. त्याही आपला प्रभाग सोडून प्रभाग क्रमांक एक मध्ये निवडणूक लढवत आहेत..

Back to top button