गोव्यात पी. चिदंबरम यांचे राजकीय चिंतन; निर्णयाची प्रतीक्षाच | पुढारी

गोव्यात पी. चिदंबरम यांचे राजकीय चिंतन; निर्णयाची प्रतीक्षाच

पणजी; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने गोव्यासाठी नेमलेले निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांच्या दोन दिवसांच्या दौर्‍यात राजकीय चिंतन झाले. अर्थातच काँग्रेसचे निर्णय दिल्लीतच होत असतात, त्यामुळे ‘वाट पाहा’ हाच संदेश काँग्रेसजनांत पुन्हा गेला. बैठकांचे सत्र पार पडले, चर्चा झडल्या, भेठीगाठी झाल्या, अन्य पक्षांचे काही नेते, इच्छुक उमेदवार पी. चिदंबरम यांना भेटून गेले. निवडणूक, पक्षातील वाद आदी कोणत्याही बाबतीत ते काहीही ठोस बोलले नाहीत. त्यांच्या उपस्थितीत एक चिंतन पार पडले.

चिदंबरम यांनी आगामी निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाशी युती करणार, याबाबत काहीही शब्द काढलेला नाही. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना बदला, या विषयावरून पक्षात उभी फूट पडली आहे. या वादावरही चिदंबरम काही बोलले नाहीत. पक्षातील नेत्यांतील मतभेद, उमेदवार जाहीर करण्याचा विषय अशा सर्व महत्त्वाच्या बाबींवर कोणताही निर्णय त्यांनी जाहीर केलेला नाही. त्यांनी सर्वांना प्रतीक्षा करायला भाग पाडले. काँग्रेसची ही खूप जुनी कार्यसंस्कृती आहे.

दोन दिवसांच्या दौर्‍यात पी. चिदंबरम यांनी सेवा दल, प्रदेश युवा काँग्रेस, महिला काँग्रेस, भारतीय विद्यार्थी संघटना (एएसयूआय) अशा विविध आघाड्यांची मते जाणून घेतली. हीच मते उमदेवार निवडीसाठी उपयोगी पडतील, असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय सर्व 40 जागांवर आम्ही उमेदवार देण्यास तयार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

सर्व मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण पक्षासाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सरकार नक्‍की बदलले जाईल आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेवर येईल, असे सांगण्यात ते विसरले नाहीत.

पूर्णपणे अपयश

या दोन दिवसांच्या बैठकीत समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी समितीला पूर्णपणे अपयश आल्याची कबुली दिली. त्या कबुलीमागे अनेक कंगोरे आहेत आणि स्थानिक नेत्यांतील

बजबजपुरी कारणीभूतही आहे. विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांतील वाद चिदंबरम मिटवतील, अशी आशा होती, पण ते वाद मिटलेले दिसले नाहीत.

प्रदेशाध्यक्षाविषयी योग्यवेळी निर्णय

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे नेतृत्व बदलणार काय, अशी विचारणा केल्यावर चिदंबरम यांनी आपण येथे कोणाचीही बदली करण्यासाठी आलेलो नाही. अशा संघटनात्मक बाबींवर योग्य वेळी चर्चा आणि निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

आगामी सरकार काँग्रेसचेच!

‘सरकार बदलले पाहिजे, ही येथील जनतेची अपेक्षा आहे. हे दोन दिवसांच्या बैठकीत मते जाणून घेतल्यानंतर दिसून आले आहे. काँग्रेस पक्ष जनतेच्या अपेक्षांची निराशा करणार नाही. काँग्रेसकडून निष्ठावान, पक्षाच्या विचारधारेतील विश्वासू, मेहनती आणि येथील जनतेच्या हिताची सेवा करण्यास तयार असणार्‍या उमेदवारांचीच निवड होईल व आगामी सरकार हे काँग्रेसचे असेल’, असे आत्मविश्‍वासाने चिदंबरम यांनी सांगितले.

मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या घोषणेवर मौन

मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची आगाऊ घोषणा केली जाईल का, यावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. कोणाचीही उमेदवारी काही महिने अगोदर जाहीर केली जाणार नाही; पण त्याला मतदारसंघात प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा, याकडे पाहिले जाईल, असे चिदंबरम यांनी सांगितले.

Back to top button