पणजी; पुढारी वृत्तसेवा : पणजीतील सिने नॅशनल थिएटरप्रश्नी नगर विकास संचालकांनी काढलेल्या आदेेशाला मंत्री विश्वजित राणे यांनी ब्रेक दिला आहे. मनपाने तयार केलेल्या प्रस्तावाला राणे यांनी परवानगी दिली असून, ही इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पणजी येथील सिने नॅशनल थिएटरच्या मालमत्तेबाबत मेसर्स राव अॅण्ड कंपनीकडे तडजोड (सेटलमेंट) करण्याचा प्रस्ताव पणजी महापालिकेने तयार केला होता. महापौर रोहित मोन्सेरात व महापालिका आयुक्त अग्नेल फर्नांडिस यांनी सत्ताधारी गटाच्या संमतीने हा निर्णय घेऊन त्यावर कार्यवाही सुरू केली होती. मात्र या निर्णयाला माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक सुरेेंद्र फर्तादो यांनी आक्षेप घेत नगर विकास खात्याकडे तक्रार केली होती.
त्यानंतर सरकारच्या सल्ल्याशिवाय महापालिकेने कुठलाच निर्णय घेऊ नये, पणजी महानगरपालिकेने नॅशनल थिएटरच्या जुन्या इमारतीच्या तडजोडीच्या प्रस्तावावर पुढे जाऊ नये. नॅशनल थिएटरच्या मालमत्तेचा कोणताही विकास सरकारच्या मान्यतेनंतर करण्यात यावा, असे नागरी संचालकांनी 25 जुलै रोजी महापालिका आयुक्तांना पाठवलेेल्या पत्रात नमूद केले होते. नगर विकास संचालकांचे हे पत्र महापालिकेला पोचल्यानंतर महापालिकेने नगर विकास खात्याचे मंत्री राणे यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.त्यानुसार राणे यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून सिने नॅशनलच्या जुन्या इमारत प्रकरणी महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावावर पुढे काम सुरू राहावे, असे आदेश दिले.
महापौर व आयुक्तांनी सिने नॅशनल इमारतीबाबत जो काही प्रस्ताव तयार केला आहे त्यानुसार प्रक्रिया पुढे चालू राहील. या प्रक्रियेत ज्या काही त्रुटी असतील त्या चर्चा करून दूर केल्या जातील, असे राणे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सिने नॅशनलची जुनी इमारत पाडण्याची प्रक्रिया आता पुढे सुरू केली जाणार आहे.