गोवा : पार्टीनंतर धिंगाणा; आठ पोलिस निलंबित | पुढारी

गोवा : पार्टीनंतर धिंगाणा; आठ पोलिस निलंबित

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  पार्टी झाल्यानंतर बिलावरून धिंगाणा घालणार्‍या आठ पोलिसांना निलंबित करण्यात आले. सांगोल्डा येथील एका रेस्टॉरंटमध्ये या आठ पोलिसांनी पार्टी केली होती. त्यानंतर जास्त बिल झाल्याचा दावा करून रेस्टॉरंट मालकाला त्यांनी शिव्या दिल्या. तसेच धमकीही दिली.

बार्देश तालुक्यातील सांगोल्डा येथील एका रेस्टॉरंटमध्ये मंगळवारी (26 रोजी) आठ पोलिसांनी पार्टी केली. मात्र, बिल देतेवेळी बिल जास्त झाले ते कमी करा, असे म्हणू लागले. एवढ्यावरच न थांबता रेस्टॉरंट मालकाला त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

निलंबित केलेल्या आठ पोलिसांमध्ये वाहतूक विभागाचे सात, तर गोवा पोलिसांचा एका पोलिस काँस्टेबलचा समावेश आहे. साळगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोल्डा येथील रेस्टॉरंटच्या मालकाने मंगळवारी रात्री उशिरा तक्रार दिली आहे. वाहतूक विभागातील आठ पोलिसांनी केलेल्या वर्तनाची माहिती दिली आहे. त्यानंतर हे पोलिस तेथून निघून गेले. झालेल्या घटनेची माहिती मालकाने रात्रीच साळगाव पोलिस ठाण्यात दिली.

ही माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहोचल्याने या घटनेचा तपास वरिष्ठांनी रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे केला. प्राथमिक चौकशीत पोलिस रेस्टॉरंट मालकाशी हुज्जत घालत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्या व या प्रकरणात सहभाग असलेल्या वाहतूक पोलिस विभागातील तीन पोलिसांच्या निलंबनाचा आदेश वाहतूक पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी बिनतारी संदेशाद्वारे काढला. उत्तर गोवा पोलिसांतील एका काँस्टेबलच्या निलंबनाचा आदेश उत्तर गोवा पोलिस अधीक्षक सोबित सक्सेना यांनी काढला. इतर चार पोलिसांच्या निलंबनाचे आदेश त्यांच्या दक्षिण गोव्यातील विविध विभागातील पोलिस अधिकार्‍यांनी काढले.

उत्तरेतील चारजण असे

निलंबित पोलिसांत हवालदार जयेश आगरवाडेकर, काँस्टेबल प्रणेश फडते, काँस्टेबल प्रज्योत फडते, काँस्टेबल सुनील म्हाळशेकर या उत्तर गोव्यातील पोलिसांचा समावेश आहे. उर्वरित चारजण दक्षिण गोव्यातील आहेत.

समाजमाध्यमांत संताप व्यक्‍त 

पोलिसांनी घातलेल्या या धिंगाण्याची राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. समाजमाध्यमांतही या पोलिसांविषयी संताप व्यक्‍त होत आहे. जनतेचे रक्षकच जर लोकांना शिवीगाळ करू लागले, धमक्या देऊ लागले तर सामान्य जनतेने न्यायाची व कायद्याच्या रक्षणाची अपेक्षा करायची कुणाकडून? असा या संतापाचा एकूण सूर आहे.

Back to top button