गोवा : पर्वरीत साडेसात लाखांचे ड्रग्ज जप्त; एकास अटक | पुढारी

गोवा : पर्वरीत साडेसात लाखांचे ड्रग्ज जप्त; एकास अटक

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) पर्वरीत कारवाई करून 7.40 लाखांचा अमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त केले. या प्रकरणी हैदराबादच्या युवकाला अमली पदार्थ जवळ बाळगल्या प्रकरणी अटक केली. पर्वरी येथील बेला विस्ता सोसायटीजवळ गौतम हॉटेल परिसरात सोमवारी मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

हैदराबाद येथील पृथ्वी श्रीनिवास पेमॅस्था (25) या युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 7 लाख 40 हजार रुपये किमतीचे 740 ग्रॅम हशिश तेल जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात मंगळवारी हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वरी येथील बेला विस्ता सोसायटीजवळ गौतम हॉटेल परिसरात अमली पदार्थ तस्करी होणार असल्याची माहिती गुप्तहेरांनी एएनसी पथकाला दिली होती.

त्यानुसार, पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई याच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर, कॉन्स्टेबल संदेश वळवईकर, रुपेश कांदोळकर, नीतेश मुळगावकर, सुदिन लिंगुडकर, मंदार नाईक व इतर पोलिस कर्मचार्‍यांंच्या पथकाने सोमवारी रात्री वरील
ठिकाणी सापळा रचला व संशयिताला मुद्देमालासह अटक केली.

Back to top button