गोवा : वर्षभरात सायबर गुन्ह्यांत वाढ | पुढारी

गोवा : वर्षभरात सायबर गुन्ह्यांत वाढ

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, इंस्टाग्राम, ट्वीटर आदी समाज माध्यमांतून होणार्‍या सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गोवा विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांमध्ये बरीच वाढ झाली आहे. गुन्हेगार समाजमाध्यमाच्या विविध विभागातून लोकांशी संपर्क साधून काही दिवसांत रक्कम दुप्पट करण्याचे आश्‍वासन देतात आणि जास्त पैशाच्या हव्यासापायी लोक आपले पैसे त्यांनी सांगितलेल्या खात्यावर जमा करतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा संपर्क बंद होतो. आपण फसल्याचे नागरिकांच्या लक्षात येते. आणि ते पोलिसांकडे धाव घेतात.

ही आर्थिक फसवणूक वगळता, इतरही अनेक प्रकारचे सायबर गुन्हे होतात. पसवले गेलेले लोक पोलिसांकडे जातात, मात्र अपुर्‍या पुराव्या अभावी क्वचितच प्रकरणाचा तपास पोलिस करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे आर्थिक पसवणुकीबाबत जागृती झालेेली असूनही काही लोक अशा प्रकाराला फसतात. पोलिसांनी 30 प्रकरणी आरोपपत्रे दाखल केली आहेत. 10 गुन्ह्यांमध्ये सी-फायनल कोर्टात दाखल केला आहे. बहुतांश प्रकरणांची चौकशी सुरू असून 26 प्रकरणे बंद करण्यात आली आहेत.

सहा महिन्यांत 24 गुन्हे
मुख्यमंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत 24 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर 2021 मध्ये संपूर्ण वर्षात 20 गुन्हे दाखल नोंद झाले आहेत. 2017 पासून जुलैच्या दुसर्‍या सप्ताहापर्यंत 116 गुन्हे नोंद झाले. त्यापैकी 2017 मध्ये 11, 2018 मध्ये 27, 2019 मध्ये 9, 2020 मध्ये 25, 2021 मध्ये 20 आणि या वर्षात आजपर्यंत 24 गुन्हे नोंद झाले आहेत.

Back to top button