गोवा : दक्षिणेतील वाढती गुन्हेगारी चिंताजनक | पुढारी

गोवा : दक्षिणेतील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

मडगाव; रतिका नाईक :  दक्षिण गोव्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. जानेवारीपासून आतापर्यंतच्या गुन्ह्यांचा आढावा घेतल्यास या सहा महिन्यांत खुनाच्या तब्बल 13, बलात्काराच्या 15 घटना घडलेल्या आहेत. तर अपहरणाची 18 प्रकरणे जिल्ह्यात घडलेली आहेत. विविध प्रकारच्या गुन्ह्यांची एकूण 580 प्रकरणे नोंद आहेत, पैकी 89.75 टक्के प्रकरणांचा तपास लावण्यात जिल्ह्यातील पोलिसांना यश आले आहे.

या महिन्याभरात दक्षिण गोव्याच्या विविध पोलिस ठाण्यात नोंद झालेले गुन्हे पाहिल्यास गोव्याचा गुन्हेगारी प्रवास भयंकर असल्याचे जाणवते. क्षुल्लक कारणावरून खून करणे, सोन्याच्या हव्यासापोटी लिफ्ट दिलेल्या महिलेचा भरदिवसा खून करणे, अशी प्रकरणे हल्ली जिल्ह्यात घडलेली आहेत. त्यामुळे माणसांचा माणसावरील विश्वास उडत चालला आहे. पूर्वीप्रमाणे आता कोणी लगेच एका अनोळखी माणसावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. तर कोणीही माणूस कधी आपल्या आरोग्याचे किंवा पाकीट मारल्याचे निमित्त सांगून एखाद्या साध्या माणसाकडून पैसे उकळणार सांगता येत नाही.

हल्ली घरफोडी, अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार व खुनाच्या घटना वाढलेल्या आहेत. यामुळे पोलिसांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता काही दिवसांपूर्वीच आझादनगरी येथे झालेल्या खुनाची घटना बघा. तर त्यापूर्वी खारेबांद येथे मजुराचा खून झाला. आझादनगरी येथे रात्रीच्या वेळी वाढदिवसाची पार्टी सुरू असताना हा खून झाला. येथे संवेदनशील भाग असल्याने पोलिसांची गस्त सुरू असती, तर या भागांत असे प्रकार घडले नसते, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. घटनेनंतर पोलिसांनी आता येथील गस्त वाढविली आहे.
सावर्डे गुड्डेमळ येथील जंगल भागात रूपा पारकर हिचा मृतदेह मिळाला होता. जो तापसानंतर खुनच असल्याचे स्पष्ट झाले. 18 मे रोजी नवेवाडे येथील दिया नाईक हिचा वेळसांव किनारी खून करण्यात आला होता. 27 मे रोजी कामगाराकडून एकाचा खून करण्याची घटना वास्को येथे घडली होती. 29 मे रोजी वास्को येथील कायतान डिसोझा यांचा खून करून लाखोंचा मुद्देमाल चोरी करण्यात आला होता. 6 जून रोजी काणकोण येथील रिया चौधरीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला अटक केली आहे. तर हल्लीच 15 दिवसांच्या आत क्षुल्लक कारणावरून दोन खून झाले.

बलात्कार तसेच अपहरण प्रकरणातही सातत्याने वाढ होत असून ही राज्यासाठी चांगली बाब नाही. अल्पवयीन मुलींचे प्रेमाच्या नावाखाली अपहरण केले जाते. नंतर त्यांचा फायदा घेतला जातो. परिणामी सर्वांत शेवटी हे प्रकरण बलात्कार म्हणून नोंद केले जाते. अशा प्रकरणी पोलिसांनी कायद्यानुसार निर्विवादपणे कुठलाही किंतु परंतु मनात न ठेवता, कुठलाही दबाव न आणता तपास केला. गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा झाली तरच अशा प्रकरणावर रोख लागू शकते, असे मत बायलाचो एकवट संस्थेच्या आवदा व्हिएगस यांनी व्यक्त केले आहे.
13 वर्षीय मुलीवरील बलात्कार करून मातृत्व लादल्याची घटना हल्लीच घडली आणि सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे. 31 मे रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी कर्नाटक येथील युवकास कुडतरी पोलिसांकडून अटक करण्यात आली. 1 जून रोजी फातोर्डा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वेगवेगळ्या प्रकरणांत दोघा संशयितांना अटक केली. बायणा येथे अर्भक कचरापेटीत सापडले होते. 3 जून रोजी वास्को येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी संशयिताला मुंबईतून अटक करण्यात आली. 4 जून रोजी 8 वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयितास अटक करण्यात आली. अशा अनेक प्रकरणानी दक्षिण गोवा ढवळून निघाला आहे.

गुन्हेगारीच्या नावाखाली चित्रविचित्र घटनाही घडलेल्या आहेत. 1 जूनला काकाकडून पुतण्याला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न कुडतरी परिसरात झाला होता. आपले अनैतिक संबंध उघड करतील या कारणाने पुतण्याचा जीवे मारण्याचा प्रकार झाला होता. तर केपे येथे पितळेची भांडी चोरणार्‍या दोघांना अटक झाली होती. इत्यादी अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत
असून पोलिसांनी कठोर पाऊले उचलून यावर रोख न लावल्यास स्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोरोना काळानंतर गुन्हेगारीचा आलेख चढता
पूर्वी चोर्‍या व्हायच्या. पण, कोरोनाचा फैलाव झाला तेव्हा लोकांच्या नोकर्‍या गेल्या. मजुरांची रोजंदारी गेली. यानंतर चोरीच्या प्रकारात बर्‍यापैकी वाढ झाल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. 20 मे रोजी केपे येथील दत्त मंदिराची फंडपेटी चोरट्यांनी पळवून नेली होती. फोंडा परिसरातील कुर्टी येथे 23 मे रोजी फ्लॅट फोडून 10 लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली. त्यानंतर 24 मे रोजी मडगाव आकेबायश येथील बंगला फोडून चोरट्यांनी 20 लाखांचा मुद्देमाल चोरला. 28 मे रोजी बेतोडा येथे दोन घरांत चोरी झाली. तर दोन दिवसांपूर्वी रूमडामळ येथे घरफोडी करून 1.90 लाख रुपयांची चोरी करण्यात आली.

Back to top button