गोवा : जखमा कशा दुर्दैवी झाल्यात काळजाला; सरकारकडून तुटपुंजी मदत | पुढारी

गोवा : जखमा कशा दुर्दैवी झाल्यात काळजाला; सरकारकडून तुटपुंजी मदत

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  तौक्‍ते वादळासोबत झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे 23 जुलै 2021 रोजी राज्यभरात अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती. या घटनेला वर्ष उलटले तरी उद्ध्वस्त घरांचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अनेक नागरिक वर्षभर प्लास्टिक कागदाचा आडोसा असलेल्या ठिकाणी राहत आहेत. सरकारकडून मदतीला होत असलेला उशीर याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे तौक्‍ते वादळाच्या जखमा अजून ताज्याच आहेत.

वर्षभरापूर्वी आलेल्या महापुराचा तडाखा इतका जबरदस्त होता की वाळवंटी, म्हादई, वेळूस रगाडा यानदीकाठची अनेक घरे वाहून गेली. सत्तरी तालुक्यातील म्हादई नदीने रौद्ररुप धारण केल्यामुळे नदीकाठी तब्बल दहा ते बारा फूट उंच पाणी आले आणि त्यामुळे अनेक घरे कोसळून पडली.

कणकिरे, अडवई, वांते, पैकूळ, म्हादई, गांजे, खडकी आदी अनेक गावातील घरे जमीनदोस्त झाली. काहींच्या घरात पुराचे पाणी शिरून लाखोंचे नुकसान झाले. अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यानंतर सरकारी पातळीवरून पंचनामे व इतर सोपस्कार झाले. मात्र वर्ष उलटले तरी अनेक पूरग्रस्तांची घरे अद्याप उभी झालेली नाहीत.

वाळपईचे आमदार व नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी खडकी येथील काही नागरिकांची घरे स्वखर्चाने उभी करून दिली. आदिवासी कल्याण खात्यातर्फे आदिवासी तथा एसटी नागरिकांची घरे बांधण्याची घोषणा झाली. खात्याच्या अधिकार्‍यांनी पाहणीही केली, पण प्रशासनातील त्रुटीमुळे अनेक नागरिकांना अद्याप योग्य तो मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे वर्षभरापूर्वी आलेल्या महापुराच्या जखमा अजूनही ताज्या आहेत.

शेती बागायतीची नुकसान भरपाई म्हणून दिलेली रक्कमही तुटपुंजीच आहे. महापुरात वाहून गेलेल्या पैकुळ पुलाच्या जागी अद्याप नवे पूल उभे राहिलेले नाही. या पुलाचे काम सुरू केले गेले, मात्र ते फारच संथपणे सुरू आहे. एक लोखंडी पर्यायी पूल उभे केले होते, मात्र ते यंदाच्या पावसात अर्ध्याहून अधिक वाहून गेल्याने पौैकुळवासीयांच्या समस्येत आणखी भर पडली. या महापुरामुळे जवळपास 8 कोटींचे नुकसान झाले होते. तटपुंज्या सरकारी आर्थिक मदतीमुळे वर्षभरानंतरही शेती व बागायतीतील कचरा व मातीचा गाळ हटवणे शक्य न झाल्याने नागरिकांना उत्पन्न घेता येत नाही. काहीनी स्वखर्चाने घरे उभे केली. आंबेडे नगरगाव येथील पूरग्रस्त च्यारी कुटुंबीय अद्याप झोपडीत राहत आहेत.

यंदाची चतुर्थी तरी स्वत:च्या घरात साजरी व्हावी
गेल्या वर्षी पुरामुळे घरे वाहून गेल्यामुळे अनेक नागरिकांना चतुर्थी घराच्या बाजूला प्लास्टिकचा आडोसा करून साजरी करावी लागली होती. वर्षभरानंतरही काही घरे अद्याप उभी झाली नसल्याने त्या नागरिकांचा यंदाही गणेश चतुर्थीला गणेशपूजन घराबाहेरच करावे लागणार आहे. किमान यंदातरी घरात गणेशपूजन करता यावे, यासाठी त्यांचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत.

आसदवासी खात्याची मदत नाहीच
आमचे घर पुरामुळे पूर्ण जमीनदोस्त झाले होते. त्यानंतर आदिवासी खात्याच्या अधिकार्‍यांनी घराची पाहणी केली. आम्हाला अनेक फेर्‍या पणजीला माराव्या लागल्या. त्यात चार- पाच हजार रुपये खर्च झाले. मात्र आदिवासी खात्याने आर्थिक मदत केली नाही. मुख्यमंत्र्यांनी पडलेल्या घराना दोन लाख मदत जाहीर केली होती. आम्हाला फक्त एक लाख रुपये मिळाले. आम्ही दोन भाऊ. 50 हजार प्रत्येकी घेऊन घराचे काम सुरु केले. मात्र पैशाची गरज होती, त्यामुळे शेवटी कर्ज घेऊन घर उभे केले. आतील कामे तशीच आहेत. आदिवासी खात्याने आम्हाला मदत द्यावी अशी अपेक्षा आहे, असे कनकिरे सत्तरी येथील आदिवासी नागरिक सुरेश गावडे यांनी सांगितले.

Back to top button