‘आरोग्या’त राजकारण आणणार नाही : आरोग्यमंत्री विश्वजित राणे | पुढारी

‘आरोग्या’त राजकारण आणणार नाही : आरोग्यमंत्री विश्वजित राणे

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  आरोग्य क्षेत्रात राजकारण न आणता सर्वांना मदत केली जाईल असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सोमवारी दिले. आरोग्य, नगरनियोजन आणि महिला व बालकल्याण खात्याच्या मागण्यांवर ते विधानसभेत बोलत होते. सरकारचा आरोग्य क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा देण्यावर भर असून त्यासाठी काही वेळ लागेल असेही ते म्हणाले.

गोमेकॉबद्दल त्यांनी सांगितले की, आम्हाला मिळणारे निधी अपुरे पडत आहेत. तरीदेखील आम्ही गोमेकॉ चांगल्या पद्धतीने चालवत आहोत. काही समस्या असतील तर त्या लवकरच दूर केल्या जातील. आम्ही गोमेकॉच्या देखभालीवरही लक्ष देत आहोत. पंधरा वर्षांपूर्वीचे गोमेकॉ आणि आताचे गोमेकॉ यात नक्कीच खूप फरक आहे. देशात फक्त आम्हीच मोफत औषधे देतो.
अधिवेशन झाल्यावर मी आणि डीन डॉ. शिवानंद बांदेकर नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के. पॉल यांना भेटून आरोग्य खात्याच्या समस्यांबद्दल सांगणार आहोत.सुपर स्पेशिअलिटी इस्पितळात कार्डियाक केंद्र, रोबोटिक सर्जरी आदी सुरु करण्यात येणार आहे. केंद्र सरकारतर्फे मिळालेल्या 277 कोटी रुपयांच्या निधीतून टर्शरी कर्करोग केंद्र उभारण्यात येणार आहे.

ते म्हणाले, राज्याची लोकसंख्या वाढली आहे. त्यानुसार काही आरोग्य सुविधा बदलणे गरजेचे आहे. सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. पेट स्कॅनर यंत्रही घेण्यात येणार आहे. याशिवाय उप आरोग्य केंद्रात स्वयंचलित अनॅलिझर यंत्रे बसविणायत येणार आहेत. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर क्रिटी केअर केंद्र, कॅथ लॅब आणि न्यूरो विभाग सुरू करण्यात येणार आहे.

Back to top button