गोवा : आझाद मैदान, हुतात्मा स्मारके करणार अधिसूचित | पुढारी

गोवा : आझाद मैदान, हुतात्मा स्मारके करणार अधिसूचित

पणजी;  पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लोहिया मैदान, आझाद मैदान, कुंकळ्ळी येथील हुतात्मा स्मारक, असोलना आणि पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारके आदी ठिकाणे ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे म्हणून अधिसूचित करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिले.

विधानसभेत सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासाला कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी वरील स्थानकांचा अंतर्भाव सरकारच्या ऐतिहासिक स्थळांच्या यादीत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील ठिकाणे ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे म्हणून अधिसूचित करण्याचे आश्वासन दिले व ही ठिकाणे पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत संरक्षित केली जातील असे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले, की सरकारचा प्रार्थनास्थळांची पुनर्बांधणी करण्याचा मानस आहे आणि सर्व पुरातत्त्व अवशेष आणि पुरातन वास्तूंचे सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्मारक आणि पुरातन वास्तूंवर राष्ट्रीय मिशनच्या मार्गावर पुरातत्वीय पुरातन वास्तू आणि अवशेषांचे सर्वेक्षण सुरू आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

दरम्यान, आमदार युरी आलेमाव यांनी मांडलेला खासगी सदस्य ठराव सर्वानुमते मंजूर करून शाळा आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ‘द चीफटेन्स ऑफ कुकळ्ळीम’ यावरील धडा समाविष्ट करण्याची मागणी मान्य करण्यात आली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, सरदार युद्ध स्मृती दिन कला शाखेसाठी इयत्ता अकरावीच्या इतिहास विषयाचा भाग असेल. 1583 मध्ये पोर्तुगीज राजवटीविरुद्ध गोव्याने केलेल्या पहिल्या उठावाच्या स्मरणार्थ सरकारने 15 जुलै रोजी हुतात्मा शहीद दिन साजरा केल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

Back to top button