गोवा : अपघातात वनकर्मचारी जागीच ठार | पुढारी

गोवा : अपघातात वनकर्मचारी जागीच ठार

फोंडा; पुढारी वृत्तसेवा :  पार उसगाव – खांडेपार येथे मुख्य महामार्गावर पिकअप जीपगाडीने दुचाकीला जोरदार ठोकरल्याने दुचाकीस्वार प्रकाश लाडको गावकर (रा. वाघोण – दाभाळ, वय 55) हे जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर जीपखाली सापडून प्रकाश हे स्कूटरसह सुमारे 50 मीटर फरफटत गेेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

फोंड्याहून तिस्क उसगावच्या दिशेने जाणार्‍या (जीए 05 टी 4268) या क्रमांकाच्या जीपगाडीने तिस्क-उसगावलाच जाणार्‍या (जीए 12 बी 3850) प्रकाश गावकर यांच्या दुचाकीला जोरदार ठोकर दिली. त्यामुळे गावकर खाली कोसळले व स्कूटरसह जीपगाडीने फरफटत गेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाले.

रात्रीच्यावेळी झालेल्या या अपघातामुळे सुरुवातीला लोकांना नेमके काय झाले ते समजले नाही, मात्र जीपगाडीच्या समोर दुचाकी आडवी झाल्याचे पाहून रस्त्यावरून जाणार्‍या इतर वाहनचालकांनी वाहने थांबवली. लगतच्या घरातील लोकांनी अपघाताचा आवाज ऐकून रस्त्यावर धाव घेऊन दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यापूर्वीच प्रकाश गावकर यांचा मृत्यू झाला होता.  प्रकाश गावकर हे वन खात्याचे कर्मचारी असून साकोर्डा वन खात्याच्या कार्यालयात कामाला होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व एक मुलगा आहे.

फोंडा पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या जीपगाडीचा चालक मूळ कोल्हापूर येथील सचिन सुरेश खराडे (वय 42) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह चिकित्सेसाठी बांबोळी इस्पितळात पाठवण्यात आला आहे.

Back to top button