पणजी : काँग्रेसच्या सहा आमदारांची मते कोणाला? | पुढारी

पणजी : काँग्रेसच्या सहा आमदारांची मते कोणाला?

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  देशाच्या 15 व्या राष्ट्रपती पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांच्या यशवंत सिन्हा यांच्यात होईल. राज्यातून मुर्मू यांनाच अधिक मते मिळणार हे नक्‍की आहे. मात्र, काँग्रेसचे 11 पैकी किती आमदार मुर्मू यांना मतदान करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्याचा विचार केल्यास मुर्मू यांना भाजपचे 20 आमदार आणि 2 खासदार मतदान करतील. 3 अपक्ष आणि मगोपचे 2 आमदारही मुर्मू यांना मत देतील. तर सिन्हा यांच्यासाठी काँग्रेसचे 11 आमदार, 1 खासदार व आपचे 2 आमदार मतदान करतील, असे असले तरी पक्षांतर नाट्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे 11 पैकी 6 आमदार कोणाच्या बाजूने मतदान करणार याबाबत साशंकता आहे. उर्वरित पाच आमदार फुटू नयेत, यासाठी पक्षाने शुक्रवारी रात्री त्यांना चेन्नई येथे हलविले होते.

चेन्नईला हलविण्यात आलेल्या पाच काँग्रेसच्या आमदारांमध्ये एल्टन डिकोस्टा, संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रुडॉल्फ फर्नांडिस आणि कर्लोस फेरेरा यांचा समावेश आहे. हे पाच आमदार रविवारी रात्री गोव्यात दाखल झाले आहेत. भाजपमध्ये जाण्यास तयार असलेले दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक आणि अ‍ॅलेक्स सिक्वेरा नेमकी कोणती भूमिका घेणार हे गुलदस्तातच आहे .

विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वी दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनी आठ आमदारांसह भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना केवळ सहा आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने पक्षांतराचा प्रयत्न फसला होता. यानंतर गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी लोबो आणि कामत यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप केला. यानंतर लोबो यांना विरोधीपक्ष नेतेपदावरून हटविण्यात आले व दोघांविरुद्ध अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सभापती रमेश तवडकर यांनी अजून त्याबाबत सुनावणी घेतलेली नाही.

दिगंबर कामत यांचीही हकालपट्टी
पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे काँग्रेसने मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरून तत्काळ हटविले होते. मात्र, त्यानंतरही दिगंबर कामत पक्षाच्या कार्यकारिणीवर होते. रविवारी कामत यांची कार्यकारिणी समितीच्या कायमस्वरूपी निमंत्रित या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच कामत यांना हटविण्यात आले.

Back to top button