गोवा : मोपानंतर दाभोळी विमानतळाचे काय? वाचा मुख्यमंत्री अधिवेशनात काय म्हणाले…

गोवा : मोपानंतर दाभोळी विमानतळाचे काय? वाचा मुख्यमंत्री अधिवेशनात काय म्हणाले…

गोवा : पुढारी वृत्तसेवा : पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मोपा विमानतळ झाला असला तरी, सध्या चालू असलेला दाभोळी विमानतळही कायम राहणार आहे. दाभोळी विमानतळाच्या विकासासाठी केंद्र सरकारने ८५० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे ते विमानतळ बंद होण्याचा प्रश्नच नाही. दाभोळी विमानतळावर अवलंबून असलेल्या लोकांना भीती बाळगण्याची गरज नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज, सोमवारी (दि. ११ जुलै) दिले.

गोवा विधानस भेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (दि. ११) सुरू झाले. हे अधिवेशन दहा दिवसाचे होणार आहे. आजच्या पहिल्या दिवशी दक्षिण गोव्यातील मुरगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संकल्प आमोणकर यांनी मोपा विमानतळ झाल्यानंतर दाभोळी बंद झाला तर त्यावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांचे काय, असा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनीही दोन्ही विमानतळाची क्षमता पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी गोव्यात येणार आहेत का? तसेच दाभोळी विमानतळ प्रवासी नाहीत म्हणून बंद केले जाईल का? असे प्रश्न उपस्थित केले होते. त्यालाच जोडून काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांनीही दाभोळी विमानतळ बंद होणार, अशी भीती व्यक्त केली.

त्या सर्वांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दाभोळी विमानतळ कदापि बंद होणार नाही. एका राज्याला दोन विमानतळाची गरज असतेच. त्यानुसार मोपा हा पीपीपी तत्त्वावर बांधला जात आहे. तर दाभोळी हा केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित केला जात असून त्याच्यावर केंद्र सरकारने ८५० कोटी निधी खर्च केला आहे. तो बंद करायचा असता तर निधी खर्च केला असता का ? असा प्रश्न सुद्धा मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी उपस्थित केला. येत्या काळामध्ये दिवसाला दीडशे विमाने गोव्यात येतील आणि ती दोन्ही विमानतळाचा वापर करतील, असे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news