गोवा : ‘जुवारी’ची जमीन विक्री हाच मोठा घोटाळा : विरोधी पक्षनेते मायकल लोबो | पुढारी

गोवा : ‘जुवारी’ची जमीन विक्री हाच मोठा घोटाळा : विरोधी पक्षनेते मायकल लोबो

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा सरकार राज्यातील जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीबाबत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून तपास करत आहे. मात्र, सरकारच्या मंजुरीने जुवारी अ‍ॅग्रोेे केमिकल्स फॅक्टरी परिसरातील 50 लाख चौै. मी. कोमुनिदादची लीजवर दिलेली जमीन परस्पर विकली जाते. हा सर्वात मोठा जमीन घोटाळा आहे. या व्यवहाराला सरकारचे पाठबळ असल्याची टीका विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना लोबो म्हणाले की, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी जुवारी अ‍ॅग्रो केमिकल्स फॅक्टरीसाठी कोमुनिदादची 50 लाख चौ. मी. जमीन लीजवर दिली होती. गोव्यातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने कोमुनिदादची ही जमीन लीजवर दिली गेली. लीजवर घेतलेली जमीन विकता येत नाही. तरीही ही विकली जात आहे. त्यावर सरकार काहीच हालचाल करत नाही. यावरून सरकारचे या व्यवहाराला पाठबळ असल्याचे सिद्ध होत असल्याचे लोबो म्हणाले.

याप्रकरणी आपण 11 जुलै पासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशानात आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस विधानसभेत सत्तरीतील मोकासो, मये स्थलांतरित मालमत्ता, वीज खात्याचा थ्री लायनर प्रकल्प, कोमुनिदाद जागा, मुरगाव पत्तन न्यास (एमपीटी) बंदरातील मधील कोळसा हाताळणी यावर आवाज उठवणार आहे. त्यासाठी काँग्रेसच्या विधीमंडळ गटाची बैठक सोमवारी 4 रोजी होणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, नगर नियोजन खात्याने मायकल लोबो व त्यांच्या पत्नी आमदार डिलायला लोबो यांना त्यांच्या दोन हॉटेल प्रकल्पाचे काम ओडीपी नियम डावलून झाल्याचे कारण देऊन नोटीस बजावली आहे. दुसरीकडे गोवा सरकारने बनावट कागदपत्रे तयार करून लोकांच्या जमिनी हडपणार्‍या एका टोळीच्या पाच सदस्यांना अटक केली आहे. जमीन बनावट कागदपत्राद्वारे विकण्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेली एसआयटीने आत्तापर्यंत 38 जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेत्यांनी जुवारी फॅक्टरीच्या जमिनीचा विषय समोर आणला आहे. त्यामुळे आपल्या बांधकामप्रकरणी अडचणीत असलेले मायकल लोबो यांना सरकारला घेरण्याची ही चांगली उपलब्ध होणार आहे.

Back to top button