पणजी : चित्रपटातून ‘विज्ञान’ सांगणार अवलिया | पुढारी

पणजी : चित्रपटातून ‘विज्ञान’ सांगणार अवलिया

पणजी : पिनाक कल्लोळी
छायाचित्रण अथवा चित्रपट म्हणल्यावर झगमगाटाच्या दुनियेचा विचार येतो. मात्र, बांबोळी येथील राकेश राव हे छायाचित्रण आणि चित्रपटाच्या माध्यमातून सामान्य जनतेला समजेल अशा पद्धतीने विज्ञान समजावून सांगत आहेत. त्यांनी नुकताच बेंगळुरू येथील भारतीय खगोलशास्त्र संस्थेसाठी ‘हॅनले – इंडियाज फर्स्ट डार्क स्काय रिझर्व्ह’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे.

‘हॅनले’मध्ये भारतातील पहिल्या राखीव अंधार्‍या आकाशावर माहिती देण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, चलचित्रण आणि संकलन राकेश यांनी केले आहे. लडाख येथील हॅनले भागात हे राखीव अवकाश अस्तित्वात येणार आहे. अवकाश निरीक्षण करणार्‍या शास्त्रज्ञ तसेच खगोलप्रेमींसाठी हे आकाश क्षेत्र पर्वणीच ठरणार आहे. राकेश यांनी यापूर्वी अंटार्क्टिका, आर्टिक, हिमालय क्षेत्रावर माहितीपट बनविले आहेत. त्यांच्या ‘दि क्लायमेट चॅलेंज’ या माहितीपटाला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सवात पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी राष्ट्रीय ध्रुवीय आणि समुद्री संशोधन केंद्र, भारतीय अवकाश संशोधन केंद्र यांसारख्या संस्थांसोबत काम केले आहे. याबाबत राकेश राव यांनी सांगितले की, छायाचित्रण किंवा चित्रपटाच्या माध्यमातून विज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचू शकते, या भावनेनेच मी माझे काम केले आहे. काही लोकांचा गैरसमज असतो की, विज्ञान या विषयावर केवळ अमेरिका, युरोपमध्ये काम होते. मात्र, भारतातही यावर काम होत आहे, हे मला दाखवून द्यायचे होते.

चांगला करिअर पर्याय
राव यांनी सांगितले की, सध्या लग्न, वन्यजीव, मॉडेलिंग छायाचित्रणाला किंवा चित्रपटांना महत्त्व आले आहे. मात्र, येणार्‍या काळात विज्ञान चित्रपटांना, छायाचित्रणालाही महत्त्व
येणार आहे. त्यामुळे युवा वर्गासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

Back to top button