गोवा : बनावट कागदपत्रांसाठी मुंबईतून आणली शाई | पुढारी

गोवा : बनावट कागदपत्रांसाठी मुंबईतून आणली शाई

पणजी , पुढारी वृत्तसेवा :  जमिनींची बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मुंबई येथून आणलेल्या खास शाईचा वापर केल्याची माहिती अटकेत असलेला मुख्य संशयित आरोपी मोहम्मद सुहेल शफी याने दिली. जुनी कागदपत्रे पुरातत्त्व खात्याकडून मिळवून ती खरी वाटावीत यासाठी कॉफीच्या पाण्यामध्ये भिजवून त्यावर मुंबईतून आणलेल्या शाईने नावात फेरफार करून जमिनी हडप केल्या जात होत्या, अशी माहिती उघड झाली आहे.

राज्यातील जे नागरिक हयात नाहीत किंवा गोव्यात नाहीत, अशा नागरिकांच्या जमिनीची कागदपत्रे पुरातत्त्व खात्याकडून मिळविली जात होती. त्यामध्ये फेरफार करून जमिनी हडप करण्याचे सत्र या टोळीने आरंभले होते. मोहम्मद सुहेल शफी हा मुख्य संशयित असून, पुरातत्त्व खात्यातील कर्मचारी धीरेश नाईक व शिवानंद मडकईकर यांनी त्याला कागदपत्रे पुरवून साहाय्य केले.

पुरातत्व खात्यातील कागदपत्रे मिळवल्यानंतर तशीच दुसरी कागदपत्रे तयार करून ती जुनी वाटावीत, यासाठी कॉफी घातलेल्या पाण्यामध्ये ती भिजवली जायची. काही वेळानंतर ती जुनाट वाटल्यानंतर सदर कागदपत्रावर मुंबईवरून आणलेल्या शाईने नावात फेरफार करून जमिनी हडप केल्या जात होत्या .
दरम्यान, मोहम्मद सुहेल शफी आणि धिरेश नाईक हे दोघेही अद्यापही पोलिस कोठडीत आहेत तर तिसरा अटक केलेला संशयित आरोपी शिवानंद मडकईकर याला मंगळवारी जामीन प्राप्त झाला आहे .

मुख्यमंत्र्यांची मॅरेथॉन बैठक

बनावट कागदपत्राद्वारे जमिनी हडप केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथक (एसआयटी) व संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांची बैठक मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील बंगल्यावर सुरू होती. त्यामुळे या बैठकीत नेमके काय ठरले ते कळाले नाही. मात्र, राज्यांमध्ये जमिनी हडप करणार्‍या टोळ्या कार्यरत आहेत. एका टोळीला एसआयटीने अटक केलेली आहे. इतर टोळ्यांचा तपास लवकरच होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्यामुळे या बैठकीनंतर मुख्यमंत्री जमीन हडप प्रकरणांमध्ये आणखी कोण आहेत त्यांचा खुलासा करू शकतात. त्याचबरोबर एसायटीच्या पुढील कारवाईबाबत आणि तपास तसेच चौकशीबाबत काही घोषणा मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे.

Back to top button