सिंधुदुर्ग : उत्तम स्टील प्रकल्प सुरू करा; अन्यथा जमिनी परत द्या! | पुढारी

सिंधुदुर्ग : उत्तम स्टील प्रकल्प सुरू करा; अन्यथा जमिनी परत द्या!

सावंतवाडी : सातार्डा येथील उत्तम स्टील प्रकल्प सुरू करा; अन्यथा शेतकर्‍यांच्या जमिनी परत करा, अशी मागणी स्थानिकांमधून जोर धरू लागली आहे. प्रकल्पासाठी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दोन हजार एकर जमीन संपादन करूनही अद्याप हा प्रकल्प सुरू झाला नसल्याने संताप व्यक्‍त होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर सातार्डा ग्रामपंचायत सरपंच संजना मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली एक ग्रामसभा घेण्यात आली. महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या सातार्डा गावात उत्तम स्टील प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 15 वर्षांपूर्वी दोन हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पात स्थानिकांना नोकर्‍या देण्याचे गाजर दाखवून विनासायस ही जमीन संपादित करण्यात आली. दरम्यान, जमीन संपादन प्रक्रिया बेकायदेशीर असल्याबाबत काही ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या होत्या. आज पंधरा वर्षे उलटली तरी हा प्रकल्प सुरू झालेला नाही. याबाबत कोणीही चर्चा करायला तयार नाही. खासदार, आमदार, मंत्री आणि स्थानिक सर्व पक्षीय नेतेमंडळी मूग गिळून गप्प आहेत. उत्तम स्टील प्रकल्प सुरू झाला असता तर आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असता. प्रकल्पामुळे स्थानिकांचा आर्थिक स्तर उंचावला असता, अशी भावना अनेक ग्रामस्थांनी ग्रामसभेत व्यक्‍त केली.

या प्रकल्पाबाबत आता शासनाला जाब विचारावा, असा ठराव या ग्रामसभेत घेण्यात आला. माजी सरपंच बाळू प्रभू, उदय पारिपत्ये, संतोष गोवेकर ,गोविंद राऊळ, नामदेव गोवेकर, ज्ञानदेव राऊळ, ग्रामसेवक सोमा राऊळ, पोलिस पाटील विनिता मयेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तम स्टील कंपनीने दोन हजार एकर जमीन संपादन केली आहे. या जमिनीला कंपाउंड वॉल बांधून बंदिस्त केले आहे. तसेच पर्यायी रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता जिल्हा परिषदेला वर्ग केला आहे. त्यानंतर प्रकल्पाचे काम बंद आहे. कंपनीने प्रकल्प सुरू करून सुशिक्षित बेकारांना नोकर्‍या द्याव्यात अशी अपेक्षा होती.

कंपनी प्रकल्प सुरू करणार नसेल आणि सुशिक्षित बेकारांना नोकरी देत नसाल तर शेतकर्‍यांच्या जमिनी परत कराव्यात, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना यापूर्वी देण्यात आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी आहेत. उत्तम स्टील संदर्भात विविध समस्यांवर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासाठी जमीन संपादनास शासनाने परवानगी देताना अटी घातल्या होत्या. मात्र, या अटींची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. उत्तम स्टील प्रकल्प सुरू करण्यासाठी काही अडचणी असतील तर दुसरा प्रकल्प सुरू करून सुशिक्षित बेकारांना नोकर्‍या द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

Back to top button