

पणजी , पुढारी वृत्तसेवा : नातेसंबंध तोडले म्हणून प्रेयसीचा खून करणार्या गौरव बिद्रे याला शुक्रवारी (दि. 24) जुने गोवे पोलिसांनी अटक केली. गौरी आचारी (35) असे मयत महिलेचे नाव आहे. गौरव हा तिचा जीम ट्रेनस म्हणून काम करत होता. गौरवला आज (दि. 25) न्यायालयात हजर केले जाणार आहे. गौरव हा सावंतवाडी येथील माजी उपनगराध्यक्षाचा मुलगा आहे.
खांडोळा महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करणारी गौरी गुरुवारपासून बेपत्ता होती. तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तिच्या फोनचे आणि गाडीचे लोकेशन यावरून पोलिसांनी गौरवला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गौरीचा खून केल्याची कबुली दिली. गौरीने नातेसंबंध तोडले म्हणून तिचा खून केल्याचे त्याने सांगितले.
जुने गोवे पोलिसांनी संशयित गौरव याच्या उपस्थितीत त्याने कदंब पठारावर झाडाझुडपात टाकून दिलेला गौरी हिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्याने तिचा खून हाताने गळा आवळून केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवला आहे. त्याचा अहवाल डॉक्टरांकडून मिळाला नसला तरी त्याने दिलेल्या खुनाच्या कबुलीनंतर खुनाचा तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव हा जिम ट्रेनस म्हणून काम करतो. त्याने बीसीसीआय, एटीएस पथकालाही प्रशिक्षण दिले आहे. त्याच्यावर काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती.