गोवा : प्रसंगी टॅक्सींचे परवाने करणार निलंबित | पुढारी

गोवा : प्रसंगी टॅक्सींचे परवाने करणार निलंबित

पणजी , पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील ज्या पर्यटक टॅक्सींनी अद्याप डिजिटल मीटर बसवले नाहीत त्यांनी ते त्वरित बसवून घ्यावेत. तसेच ज्यांनी बसवलेत त्यांनी मीटरचा वापर करून भाडे आकारावे. अन्यथा टॅक्सींचे परवाने निलंबित केले जातील, असा इशारा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला आहे.

गुरुवारी (दि. 23) माध्यमांशी बोलताना गुदिन्हो म्हणाले, की राज्यातील सर्व पर्यटक टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तसेच पर्यटकांचीही मागणी आहे. त्यानुसार गोवा सरकारने मोफत डिजिटल मीटर उपलब्ध केले आहेत. तरीही काहीजण ते बसवण्यास चालढकल करत आहेत त्या टॅक्सीचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी गुदिन्हो यांनी दिला.

गोव्यात कार्यरत असलेल्या 11 हजार 250 टॅक्सींपैकी 9 हजार 366 टॅक्सींना डिजिटल भाडे मीटर बसविण्यात आले आहेत. उर्वरित सुमारे 900 टॅक्सींना अद्याप मीटर बसवलेले नाहीत.
याचिका निकालात राज्यातील पर्यटक टॅक्सींना न्यायालयाने दिलेल्या वेळेत राज्य सरकार टॅक्सींना मीटर बसवण्यास अपयशी ठरल्याची अवमान याचिका ट्रॅव्हल्स व टुरिझम संघटनेने न्यायालयात दाखल केली होती. ही अवमान याचिका बहुतांश टॅक्सींना मीटर बसवले गेल्यामुळे न्यायालयाने निकाली काढली आहे.

राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी वरील माहिती न्यायालयाला दिली आहे. अ‍ॅड. पांगम यांनी सांगितले, की आणखी 50 टॅक्सींनी मीटर आरक्षीत केले आहेत. त्यामुळे ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा आणि इतर भागधारकांनी टॅक्सींमध्ये मीटर बसवण्याची मागणी करणारी जी अवमान याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती, ती न्यायालयाने निकाली काढली, असे अ‍ॅड. पांगम यांनी सांगितले.

Back to top button