गोवा : ‘एसआयटी’चा पहिला दणका मडगावात | पुढारी

गोवा : ‘एसआयटी’चा पहिला दणका मडगावात

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बनावट कागदपत्रे करून राज्यातील जमीन हडपप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हल्लीच स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणातील पहिली कारवाई करताना मडगाव येथील विक्रांत शेट्टी याला अटक केली आहे. संशयित विक्रांत याला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आसगाव बार्देश येथील जमीन मूळ जमीन मालकाच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून संशयिताने निबंधक खात्यासह महसूल खात्याच्या मार्फत स्वतःच्या नावे केली व ती परस्पर विकली. राज्यातील बार्देश, तिसवाडी, पेडणे, सासष्टी व इतर तालुक्यांत असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पोलिसांत अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत. याची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तीन दिवसांपूर्वी गुन्हे विभागाचे अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्यीय एसआयटी नियुक्त केली आहे. या पथकाने शनिवारी पहिली कारवाई करत शेट्टी यास अटक केली. आसगाव येथील जमीन बनावट कागदपत्रे करून विकल्याचा शेट्टी याच्यावर आरोप आहे.

उ. गोव्यातील सुमारे 70 ठिकाणच्या जमिनी विकल्या

संशयित विक्रांत शेट्टी याची पोलिसांकडून कसून चौकशीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शेट्टी याने उत्तर गोव्यातील 60 ते 70 ठिकाणच्या जमिनी बनावट कागदपत्रे करून विकल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

27 लाखांला फसवले

सुकूर स्थितीत हर्षसमर्थ डेव्हलपर्स या कंपनीचे मालक संदीप अर्जुन वझरकर (रा. बस्तोडा, मूळ सुकूर) व अविनाश सूर्या नायक (रा. बारोंसवाडा , सांगोल्डा) यांच्या विरुद्ध म्हापसा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भूखंड देण्याचे सांगत पर्वरी येथील अगरवाल दाम्पत्याकडून 27 लाख रुपये संशयितांनी घेतले. नंतर भूखंड देण्यास संशयित टाळाटाळ करू लागल्याचे लक्षात आल्याने फिर्यादींनी त्यांच्याकडे रक्कम परत करण्याची मागणी केली. तरीही त्यांनी ती केली नाही. त्यामुळे संशयितांच्या विरोधात अगरवाल दाम्पत्याने म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

Back to top button