अधिकार्‍यांचा ‘अर्थ’पूर्ण वादाचा विद्यार्थ्यांना अडथळा

अधिकार्‍यांचा ‘अर्थ’पूर्ण वादाचा विद्यार्थ्यांना अडथळा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : दोन शासकीय अधिकार्‍यांच्या 'अर्थ'पूर्ण वादामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यामध्ये अडथळा निर्माण झाल्याचे समजते. शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन आठवडा उलटला तरीही इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची पाठ्यपुस्तके अजूनही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली नाहीत.
चार कोटी रुपये खर्च करून मागवलेल्या पाठ्यपुस्तकांचा साठा कोल्हापुरात अडकून पडला आहे. पर्वरीचा गोदाम उर्वरित पुस्तकांनी खचाखच भरून गेला आहे. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे कोल्हापुरात आणि पर्वरीच्या गोदामात पडून असलेली पुस्तके मुलांपर्यंत पोहोचली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

सर्वशिक्षा अभियानातील खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या तालुक्याच्या ठिकाणी पुस्तकांचा साठा तयार आहे. तो अजून गोव्यात आणलेला नाही. त्यामुळे एकही विद्यार्थ्यांला अजून पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली नाहीत. काही दिवसांपूर्वी पुस्तकांचा साठा पर्वरीत दाखल झाला होता. त्यातील एकही पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. कागल येथे जी पुस्तके तयार आहेत, ती गोव्यापर्यंत येण्यासाठी वरिष्ठांनी आदेश दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मेमध्येच पुस्तकांचा साठा गोव्यात दाखल होतो. पण यंदा जून अर्ध्यावर पोहोचला तरीही गणिताची दोन पुस्तके सोडल्यास बाकी पुस्तके विद्यालयापर्यंत पोहचलेली नाहीत. गणिताची दोन पुस्तके नेण्यासाठी खात्याने शाळांना सूचित केले होते. पण दोनच पुस्तकांसाठी बालरथ पाठवता येणार नाही, असे काही शाळांकडून खात्याला कळविल्याचे समजले.
प्राप्त माहितीनुसार सर्व शिक्षा अभियानाने या पुस्तकांसाठी चार कोटी रुपये एस. सी. आर. टी.ला दिले आहेत. संबंधित छापखान्याला हे पैसे मिळाले असून पुस्तकांची छपाईसुद्धा झालेली आहे. आता आदेश देण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना कधी वेळ मिळतो, पहावे लागेल.

मुख्यमंत्र्यांकडून कानउघडणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी बुधवारी शिक्षण खात्याच्या अधिकार्‍यांना तातडीने बोलावून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे आता विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news