पणजी : जुने राजभवन होणार राष्ट्रीय स्मारक | पुढारी

पणजी : जुने राजभवन होणार राष्ट्रीय स्मारक

पणजी : पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वात जुने राजभवन असणार्‍या राज्याच्या राजभवन इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. राजभवनाच्या नव्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर जुनी इमारत पर्यटकांसाठी खुली होणार आहे, अशी घोषणा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी दोना पावला येथे केली. बुधवारी येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नव्या राजभवनाच्या इमारतीची पायाभरणी झाली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले की, राजभवनाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला असला तरी सुरक्षेच्या किंवा अन्य कारणास्तव सध्या येथे पर्यटकांना बंदी आहे. राष्ट्र्पतींनी मागच्या भेटीदरम्यान नवे राजभवन उभे करावे, असा सल्ला दिला होता. देशातील अन्य राज्यांतही नवे राजभवन बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्याची सध्याची राजभवन इमारत स्थिर असली, तरी ती पर्यटकांना पाहायला मिळावी यासाठी सरकारने नवे राजभवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आम्ही केंद्र आणि राज्य सरकारची मदत घेतली आहे. असे असले तरी जुन्या इमारतीमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.

मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या योजना राज्यातील सर्व समुदायांपर्यंत 100 टक्के पोहोचवल्या जाणार असलयाचे सांगितले. ते म्हणाले की, गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्धापनदिनांनतर साधारणपणे एका वर्षांनी राज्याला राष्ट्रपतींचे आदरतिथ्य करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या मेहनतीने देशातील सर्वात मोठ्या पदावर पोहोचलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या इमारतीची पायाभरणी होणे ही समस्त गोवेकरांसाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. अंत्योदय तत्वावर काम करणारे राज्य सरकार विविध योजनांद्वारे जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी कटीबद्ध आहे. राज्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

राष्ट्रपतींच्या आगमनापूर्वी राज्यपाल पिल्लई यांच्या हस्ते राजभवन परिसरातील गणेशाची तसेच पायाभरणीच्या ठिकाणाची पूजा करण्यात आली. दहाच्या सुमारास राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या वास्तूची पायाभरणी झाली. यानंतर त्यांनी कोनशिलेलचे अनावरण करून नव्या इमारतीच्या प्रारूपाची पाहणी केली. कार्यक्रमाच्या शेवटी राज्याला विविध उत्पादनांना जीआय मानांकन मिळवून देणार्‍या व्यक्तींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये गुरुदत्त भक्ता, रत्नाकर वेळीप, लवू ठाकूर, राजाराम चणेकर, दीपक परब , डॉ लेव्हिसन्स मार्टिन्स आणि अशोक धावस्कर यांचा समावेश आहे.

राज्यात आध्यात्मिक पर्यटनाला वाव

राज्यपालांनी सांगितले की , राज्यातील शहरांपेक्षा गावे अधिक सुंदर आहेत. येथील लोक मानाने चांगले आणि कष्टाळू आहेत. यामुळे राज्यात अध्यात्मिक पर्यटनालाही वाव आहे. केवळ हिंदू नव्हे तर ख्रिस्ती धर्मातही अध्यात्मिक पर्यटन या संकल्पनेचा वापर केला जाऊ शकतो.

तांत्रिक कारणांमुळे राष्ट्रपतींचे भाषण नाही

राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले की, काही कायदेशीर आणि तांत्रिक कारणास्तव बुधवार सकाळपासून राष्ट्रपतींच्या जाहीर कार्यक्रमांच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे मुख्य पाहुणे असणारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद भाषण करू शकणार नाहीत. त्यांच्यासोबत होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

Back to top button