केरळच्या व्यक्‍तीला दोन लाखांना गंडा | पुढारी

केरळच्या व्यक्‍तीला दोन लाखांना गंडा

वास्को ; पुढारी प्रतिनिधी : आयकर अधिकारी असल्याचे भासवून केरळ येथील एका व्यक्तीचे 1लाख 80हजार रुपये व 400 ग्रॅम सोने लुटणार्‍यांपैकी मांगोरहिल येथील मौलाली शेख याला वास्को पोलिसांनी गुरुवारी अटक केली. रात्री उशिरा केलेल्या धडक कारवाईत ताब्यात घेऊन केरळ पोलिसांच्या स्वाधीन केले. मौलाली याला ताब्यात घेतल्याचे कळताच आणखी एका संशयिताने पोलिस घरी पोहचण्यापूर्वीच पळ काढला. मौलाली याला घेऊन केरळ पोलिस शुक्रवारी पहाटे केरळला निघाले.

मौलाली हा मांगोरहिलच्या रेल्वे वसाहतीमध्ये राहतो. तो रेल्वेमध्ये कामाला आहे. मौलाली व त्याचा आणखी एक सहकारी हे दोघे केरळला गेले होते. तेथे त्यांना आणखी तीनजण स्थानिक मिळाले. त्या पाचजणांनी एका व्यक्तीला आम्ही आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्याला लुटले. त्या व्यक्तीने 5 जूनला इमाकुरम -केरळ पोलिस स्थानकामध्ये याप्रकरणी तक्रार दिली. त्या तक्रारीची दखल घेऊन केरळ पोलिसांनी शोध सुरू केला असता मौलाना व त्याच्या मित्राचे नाव समजले. ते दोघेही वास्कोचे असल्याची माहिती मिळताच केरळ पोलिस वास्कोला आले.

त्यांनी वास्को पोलिसाच्या सहकार्याने कारवाई करताना मौलाली याला मांगोरहिल झोपडपट्टीतून ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यावर सावध झालेल्या त्याच्या मित्राने पोलिस पोहचण्यापूर्वीच पळ काढला. त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश मातोंडकर, हवालदार संतोष भाटकर, सचिन बांदेकर, गौरिश सातार्डेकर या पोलिस पथकाने केली.

Back to top button