आयपीएलचा सामना गोव्यात होण्यासाठी प्रयत्न – गोविंद गावडे | पुढारी

आयपीएलचा सामना गोव्यात होण्यासाठी प्रयत्न - गोविंद गावडे

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पेडणे तालुक्यातील धारगळ येथे 153 एकर जागेत होऊ घातलेल्या क्रीडानगरीत मैदानाबरोबरच क्रीडा अकादमीही असेल. पुढील काळात आयपीएलचा एखादा सामना गोव्यात व्हावा, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. तो फातोर्डा स्टेडियमवरही होऊ शकतो. तसेच पेडणे किंवा थिवी येथे अत्याधुनिक जागतिक दर्जाचे क्रिक्रेट मैदान बांधण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी यापूर्वी आरक्षित केलेल्या जागांची पाहणी आपण करणार आहे, अशी माहिती क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

पणजी येथे सोमवारी (16 रोजी) एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावडे यांनी सांगितले, की धारगळ येथील क्रीडानगरीत बास्केटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल यासारख्या खेळासाठी जागतिक दर्जाची मैदाने उपलब्ध केली जातील. गोव्यात जास्तीत जास्त क्रीडापटू तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जातील. करासवाडा थिवी येथील क्रिकेट मैदानाच्या जागेची आपण लवकरच पाहणी करणार असल्याचे गावडे म्हणाले.

कुरैय्या फाउंडेशनने सरकारच्या कामात हस्तक्षेप करू नये

पणजी ः कला अकादमीचे नूतनीकरण करण्यासाठी चार्लस कुरैय्या फाउंडेशनला सल्लागार नेमण्यात आले होते. त्यांना सरकारने ठरलेली रक्कम दिली आहे. नूतनीकरण करताना कला अकादमीच्या मूळ ढाच्यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही. मात्र, नूतनीकरण करताना काही बदल हे होतातच. त्यामुळे चार्लस कुरैय्या फाउंडेशनने सरकारच्या कामात हस्तक्षेप करू नये, असा इशारा कला अकादमीचे अध्यक्ष व कला व सांस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दिला आहे. चार्लस कुरैय्या फाउंडेशनने पत्रकार परिषद घेऊन कला अकादमीच्या नूतनीकरणाबाबत संशय व्यक्त केला होता. त्यावर खुलासा करताना गावडे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्‍त दिली.
कला अकादमी ही सरकारची वास्तू आहे. सरकार त्यावर पैसे खर्च करतेय. त्यामुळे सल्लागार कंपनीला कला अकादमीच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कला अकादमीचा मूळ ढाचा न बदलता गोव्यातील कलाकारांना हवी तशीच होणार आहे. सार्वजनिक बांंधकाम खात्याचे सुवर्णपदक अभियंते नूतनीकरणाचे काम करत आहेत. आपण स्वत: एक अभियंता आहे. त्यामुळे कुणी नाहक संशय व्यक्त करू नये, असे सांगून कला अकादमीच्या कामात अडथळा आणू नये व नूतनीकरणाचे काम लांबवू नये. यासाठी लोकांसाठी प्रवेश बंद केल्याचे गावडे यांनी एका प्रश्‍नावर बोलतांना सांगितले.

पदक विजेत्यांना नोकर्‍या देणार

गोव्यातील जे क्रीडापटू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करतात. त्यांना सरकारी नोकरीत टप्प्याटप्प्याने सामावून घेण्यात येणार आहे. सध्या पोलिसांत अशा खेळाडूंना संधी देण्यात येत आहे, अशी माहिती गावडे यांनी दिली.

17 वर्षांखालील फुटबॉल विश्‍वचषकासाठी गोवा सज्ज

गोव्यात 17 वर्षांखालील फुटबॉल विश्‍वचषकाचे काही सामने ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. त्यासाठी क्रीडा खात्याने गरजेच्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी काम सुरू केले आहे, अशी माहिती गावडे यांनी अंडर-17 विश्‍वचषक फुटबॉल सामन्यांवर बोलताना दिली.

Back to top button