

Goa Acid Attack
पणजी : धारगळ येथील सुकेकुळण भागात सोमवारी सकाळी ७.५० वाजता एका १७ वर्षीय विद्यार्थ्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याने खळबळ उडाली. या हल्ल्यात ऋषभ उमेश शेट्ये (वय १७) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळात रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अशा प्रकारच्या हल्ल्यांचा निषेध करण्यात येत आहे.
ऋषभ शेट्ये हा विद्यार्थी म्हापशातील सारस्वत उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून नेहमीप्रमाणे तो सकाळी शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत उभा होता. याच दरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांपैकी एकाने त्याच्यावर अॅसिड फेकले आणि घटनास्थळावरून पळ काढला. अॅसिड अंगावर पडल्यानंतर अंग होरपळू लागल्याने ऋषभ सुमारे १०० मीटरपर्यंत धावत गेला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. ऋषभचे वडील पोलीस कर्मचारी आहेत.
या हल्ल्याचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर कोण होते त्याचा तपास सुरू आहे. पेडणे पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.