

पणजी : पार्टटाईम नोकरीची ऑफर देत ऑनलाईन प्रति रेटिंग 40 रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून वेरे-बार्देश येथील एका युवकाला 9.50 लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी जगदीश अशोक बोकोलिया (26, आदर्श नगर, शेल कॉलनी रोड,चेंबूर,मुंबई) याला अटक केली. या प्रकरणी विलियम कार्दोज (पर्वरी) यांनी पर्वरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार, 5 जून 2025 रोजी एफआयआर दाखल केला होता.
25 मे ते 2 जून 2025 पर्यंत पर्वरी, बार्देश येथे अज्ञात आरोपीने अर्धवेळ नोकरीची ऑफर देत त्याला प्रति रेटिंग 40 रुपये परतफेड करण्याचे आश्वासन देऊन आणि टेलिग्राम अॅप इन्स्टॉल करून सुरुवातीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच त्याला 9,50,149 रुपये देण्यास प्रवृत्त केले होते. ही रक्कम तक्रारदाराने ऑनलाइन पद्धतीने पाठवली होती.
तपासात पोलिसांनी अनेक बँक खाती आणि फोन नंबरचे विश्लेषण केले. या गुन्ह्यात अनेक लोक सहभागी असल्याचे उघड झाले आहे. एक आरोपी मुंबईत असल्याचे आढळल्यामुळे पर्वरी पोलिस उपनिरीक्षक अरुण शिरोडकर, कॉन्स्टेबल आकाश नावेलकर, हेमंत गावकर आणि ऋषिकेश शेटगावकर यांचा समावेश असलेले पथक शनिवार, दि.28 जून 2025 रोजी तत्काळ मुंबईला गेले आणि त्यांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी उत्तर गोव्याचे पोलिस उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक राहुल परब पुढील तपास करत आहेत.