गोवा : कोरोनाचा स्ट्रेन तपासणारी प्रयोगशाळा रखडली | पुढारी

गोवा : कोरोनाचा स्ट्रेन तपासणारी प्रयोगशाळा रखडली

पणजी; तेजश्री कुंभार : कोरोनाचा विकसित होणारा प्रकार (स्ट्रेन) तपासण्यासाठी राज्यात स्वतंत्र प्रयोगशाळेचे काम ‘गोमेकॉ’ त सुरू आहे. हे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असले तरी अद्यापही ही प्रयोगशाळा कार्यरत झालेली नाही. जुलै अखेरीपासून कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सुरुवात होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता.

गेल्या काही दिवसांमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या काळजीत टाकणारी आहे. त्यामुळे लवकर ही प्रयोगशाळा सुरू व्हावी, अशी मागणी डॉक्टरांमधून जोर धरत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून यासंदर्भात एकही बैठक झालेली नाही. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीसुद्धा याबाबतचा पाठपुरावा प्रत्यक्ष भेट देऊन घेतलेला नाही.

जूनमध्ये गोमेकॉत झालेल्या कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये या प्रयोगशाळेचा उल्लेख झाला होता. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे प्रयोगशाळा सज्ज ठेवण्यासाठीची गरज टास्क फोर्सने नोंदविली होती. मात्र तरीही प्रयोगशाळेचे काम संथपणे सुरु आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेवेळी कोरोनाच्या लक्षणापेक्षा वेगळी लक्षणे असणार्‍या रुग्णांचे नमुने स्ट्रेन तपासणीसाठी पुणे आणि हैदराबाद येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविले होते. आणि दोन्ही वेळी लाट येऊन गेल्यानंतर घातक असणारा स्ट्रेन लक्षात आला. स्ट्रेन आधी लक्षात आला तर खबरदारीचे उपाय करणे सोपे असते, ज्यामुळे आजाराबाबतची तीव्रता आणि मृत्यूचे प्रमाण कमी होण्याससुद्धा मदत होत असल्याने या प्रयोगशाळेची गरज आहे.

हा तर गाफीलपणा

लाट आली की अनेक विषयांवर बोलले जाते. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाच्या चाचण्यांबद्दल बोलले जात होते तसेच दुसर्‍या लाटेवेळी या प्रयोगशाळेची चर्चा होती. लाट ओसरली तशीच चर्चा कमी झाली. हा तर गाफीलपणा असल्याची प्रतिक्रिया आरोग्य खात्यात काम करणार्‍या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्‍त केली.

इतर खातीही जबाबदार

गोवा साधन सुविधा विकास महामंडळाकडून (जीएसआयडीसी) प्रयोगशाळेसाठीचे काम प्रलंबित झाले असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली. हे काम केवळ गोमेकॉतील डॉक्टरांचे नाही तर इतर संबंधित खात्यांचेसुद्धा आहे. प्रत्येकवेळी गोमेकॉ व्यवस्थापणाला दोष देणे बंद करायला हवे.

Back to top button