पणजी : भाजपचा विजयोस्तव | पुढारी

पणजी : भाजपचा विजयोस्तव

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीत 40 पैकी 20 जागा पटकावलेल्या भाजपने काल खर्‍या अर्थाने विजयोत्सव साजरा केला. राज्यभरातील जनतेला मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात केवळ सहभागी होण्याची संधी दिली एवढेच नव्हे तर आलेल्या प्रत्येकाच्या शुभेच्छा कार्यक्रमस्थळी तासभर उभे राहून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वीकारल्या. राज्यभरातून केवळ आपल्या लाडक्या नेत्यांच्या प्रेमापोटी बांबोळीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये धाव घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या हृदयात मुख्यमंत्र्यांनी स्थान मिळवले.

शपथविधी सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली. सर्वजण जाण्यासाठी उठणार तोच निवेदकाने मुख्यमंत्री दोनच मिनिटात परत येतील तोवर थांबा असा आग्रह केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री मंचावर परतेपर्यंत सात-आठ मिनिटे लागली. तेे सर्वांना उद्देशून चार शब्द बोलतील, अशी सर्वांची अपेक्षा होती. त्यासाठी कान टवकारले गेले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सर्वांना भेटण्यासाठी मंचावर या असे हात हलवून सांगितले.

निवेदकाने डाव्या हाताने ‘या’ आणि उजव्या हाताने ‘खाली जा’ असे सांगितल्यावर लोकांनी आपसूक रांग केली. हस्तांदोलन, नमस्कार करत मुख्यमंत्री सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत होते. उत्साही कार्यकर्ते सेल्फी घेत होते, छायाचित्रे टिपत होते. सारे काही शिस्तीत सुरू होते. ढकलाढकली नव्हती. स्टेडियमबाहेर चहापानाची व दुपारच्या जेवणाची व्यवस्था होती. एखादे घरात मंगलकार्य असावे आणि त्यासाठी आलेल्यांना आता जेवूनच जा असा आग्रह केला जातो तसा आग्रह केला जात होता. भाजपचा विजयोत्सव यापेक्षा वेगळा असू शकत नव्हता याची प्रचिती नेटक्या आयोजनातून आली.

बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये उभारण्यात आलेल्या विधानसभेच्या इमारतीच्या भव्य व देखण्या प्रतिकृतीच्या समोर गोवा मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळ्यास उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मात्र या सोहळ्यास उपस्थित नव्हते. सात हजार क्षमतेच्या या स्टेडियममध्ये पाय ठेवण्यास देखील जागा नव्हती. त्याशिवाय स्टेडियमच्या बाहेरही बर्‍यापैकी गर्दी होती. दरम्यान, शपथविधी झालेल्यांपैकी राणे, गुदिन्हो, काब्राल, गावडे हे सावंत यांच्या मागील सरकारमध्ये मंत्री होते. खंवटे हेही अल्पकाळासाठी महसूल मंत्री होते.

हे झाले मंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि आतानासिओ मोन्सेरात यांनी मंत्रिपद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सर्वांना शपथ दिली.

आता कोणाला संधी?

मंत्रिमंडळातील तीन जागा सध्या रिक्त आहेत. त्यासाठी कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये, सांग्याचे आमदार सुभाष फळदेसाई, सावर्डेचे आमदार गणेश गावकर, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर या सहा पैकी कोणत्या तिघांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळेल, याचे उत्तर या महिन्याच्या अखेरीस मिळणार आहे.

Back to top button