

पणजी : पुढारी वृत्तसेवा : पीडितांना न्याय देण्यासाठी, वास्को आणि केपे येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेची निष्पक्ष चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने सोमवारी केली. विद्यार्थ्यांना मारहाणीच्या प्रकरणात विनाकारण त्रास दिला जात आहे, याशिवाय या घटनेला राजकीय रंग देण्याचा जो प्रयत्न चालविला आहे, त्याचा काँग्रेस निषेध करीत असल्याचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.
सोमवारी सायंकाळी 4 वाजता महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांची भेट निश्चित झाली होती. परंतु ते काही कारणास्तव कार्यालयातच फिरकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने जे पोलिस महासंचालकांना निवदेन दिले जाणार होते, ते आम्ही त्यांच्या नावे मुख्यालयात सादर केले आहे, असे लोबो म्हणाले. लोबो म्हणाले की, वास्को येथे घडलेल्या हिंसाचाराच्या नुकत्याच झालेल्या घटनेने सत्ताधारी पक्ष समर्थकांच्या फायद्यासाठी आणि विरोधकांना त्रास देण्यासाठी सत्तेचा कसा वापर करत आहे , हे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. वास्को प्रकरणात मयेकर कुटुंब भाजप समर्थक आणि भगत कुटुंब काँग्रेस समर्थक असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण काँग्रेस-भाजपमधील भांडण असल्याचे दिसत असून, ते पूर्णतः चुकीचे असल्याचे आमदार आमोणकर यांनी सांगितले.
याप्रसंगी अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस जनार्दन भंडारी, प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर, महिला अध्यक्षा बिना नाईक, अर्चित नाईक, साईश आरोसकर, अमित पाटकर, विवेक डिसिल्वा, विरेन शिरोडकर आदींची उपस्थिती होती.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie