पणजी : भाजप सरकारचा बुधवारी शपथविधी

पणजी : भाजप सरकारचा बुधवारी शपथविधी
Published on
Updated on

पणजी (पुढारी वृत्तसेवा) : राज्य सरकारचा शपथविधी बुधवारी (23 मार्च) दुपारी चार वाजता बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमच्या सभागृहात होणार आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय पातळीवरील भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण 40 मतदारसंघांत प्रत्येकी एका ठिकाणी आणि प्रत्येक तालुक्याच्या मुख्य ठिकाणी मोठ्या पडद्यावर पाहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रिपदी डॉ. प्रमोद सावंत हेच कायम राहतील, असेही शुक्रवारी भाजपकडून अधिकृतपणे सांगण्यात आले. त्यांच्या मंत्रिमंडळात कोणते नवे चेहरे असतील याविषयी उत्सुकता कायम आहे.

कांपाल येथील मैदानावर हा समारंभ करण्याचा विचार आधी भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांचा होता. शपथविधी सोहळा सकाळी 10 वाजता घेण्याचेही नियोजन करण्यात येत होते. मात्र दिवसा वाढणारा उकाडा पाहता तो समारंभ सायंकाळी आयोजित करण्याचे् ठरवण्यात आले. मात्र काणकोणपासून पेडण्याच्या ग्रामीण भागातील लोक या सोहळ्यासाठी येणार असे अपेक्षित धरून शपथविधीची वेळ दुपारी चार वाजताची ठरवली आहे. कांपाल येथील मैदानावर हा सोहळा आयोजित करायचा झाल्यास तेथील मातीचा ढिगारा हलवण्यापासून शामियाना हलवेपर्यंत सार्‍या गोष्टी कराव्या लागल्या असत्या. यामुळे बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमचा पर्याय विचारात घेण्यात आला. भाजपचे अनेक मेळावे आजवर तेथे झालेले आहेत. त्यामुळे तेथील गर्दीच्या व्यवस्थापनाचा पूर्वानुभव भाजप पक्ष संघटनेला असल्याने तेथेच शपथविधी सोहळा आयोजित करण्याचे नक्की करण्यात आले आहे. शपथविधी सोहळा ठरल्यामुळेच काल झालेल्या पत्रकार परिषदेत सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी चार दिवसांत सरकार सत्तारूढ होईल, असे छातीठोकपणे नमूद केले आहे.

मुख्यमंत्रिपदी सावंतच : फळदेसाई, गावडे

मुख्यमंत्रिपदी कोण, या प्रश्‍नाचे उत्तर भाजपने काल दिले. सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच पुढील पाच वर्षे भाजप सरकारचे नेतृत्व करतील, असे भाजपच्या प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नमूद केले. त्यांनी सांगितले, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. भाजप ही शिस्तबद्ध संघटना आहे. नेत्यांनी निर्णय घेतला की त्याची अंमलबजावणी केली जाते. पक्षाच्या भाषेत सांगायचे तर भूमिका दिली जाते. त्यामुळे मंत्रिपदासाठी कोणी लॉबिंग करू शकत नाही. आताही पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या पातळीवर डॉ. प्रमोद सावंत यांनीच गोव्यात भाजप सरकारचे नेतृत्व करावे, असे ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी कोण हा प्रश्नच आता शिल्लक नाही. भाजपचे सर्व आमदार एकत्र असून काँग्रेससारखे त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्याची वेळ भाजपवर येणार नाही. आमदार गोविंद गावडे यांनी नमूद केले, कोव्हिड महामारी, तोक्‍ते वादळ, महापूर या संकटांत डॉ. सावंत यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. ते उत्तम प्रशासक आहेत. पंतप्रधानांनीही त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीची स्तुती केली आहे. त्यांच्या नेतृत्वाविषयी पक्षात मतभेद नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news