‘द काश्मीर फाईल्स’ दाखवण्यास टाळाटाळ

‘द काश्मीर फाईल्स’ दाखवण्यास टाळाटाळ

मडगाव (जि. दक्षिण गोवा) ; पुढारी वृत्तसेवा : काश्मिरी पंडितांवरील अनन्वित अत्याचाराचे चित्रण असलेल्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून गोव्यात वाद पेटू लागला आहे. हा चित्रपट लोकांनी पाहू नये, म्हणून चित्रपटगृहात या चित्रपटाचे पोस्टर्स लावलेले नाहीत. तसेच आसन व्यवस्था शिल्लक असतानाही चित्रपट हाऊसफुल्ल असल्याचे सांगून लोकांना परत पाठवले जात असल्याचे उघड झाले आहे. येथील स्वामी समर्थ मंदिराच्या कार्यकर्त्यांनी आयनॉक्स चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाला धारेवर धरून त्याची चांगलीच कानउघाडणी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे.

दोन दिवसांतच या चित्रपटाचे खेळ बंद करण्याच्या प्रयत्नातील चित्रपटगृहांना यामुळे चांगलाच दणका बसला आहे. आता दर दिवशी एकोणीस वेळा चित्रपट दाखवावा लागत आहे. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

1990 च्या दशकातील काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराच्या विषयावर आधारित हा चित्रपट आहे. गोव्यातील थिएटर्समध्ये हा चित्रपट लागला होता. मात्र, चित्रपटगृहांनी या चित्रपटाचे बॅनर्स लावले नव्हते. मडगावच्या आयनॉक्समध्ये चित्रपटाचे सर्व खेळ हाऊसफुल्ल असल्याचे सांगून, लोकांना परत पाठवले जात होते. व्यवसायाने शिक्षक असलेल्या स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष जयेश नाईक यांनी याबाबत आयनॉक्सचे व्यवस्थापक अमर रिजवी यांची भेट घेत त्यांना जाब विचारला.

सध्या प्रदर्शित झालेल्या आणि प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या सर्व चित्रपटांचे पोस्टर्स आयनॉक्सबाहेर लावले आहेत; पण 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे एकही पोस्टर्स का लावले नाही? चित्रपटगृहात आसन व्यवस्था उपलब्ध असताना शो हाऊसफुल्ल म्हणून का दाखवला जात आहे? अशा प्रश्‍नांचा नाईक यांनी रिजवी यांच्यावर भडिमार केला. रिजवी यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. तिकीट नसल्याचे कारण सांगून माघारी पाठवलेल्या लोकांनीही रिजवी यांना धारेवर धरले. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केले, त्यांची ओळख जाहीर करा, अशी मागणीही केली; पण व्यवस्थेमध्ये तांत्रिक चूक झाल्याचे सांगून त्यांनी माहिती देण्यास टाळले.

रिजवी आणि जयेश नाईक यांच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये दाखवला जावा. तसेच इतर चित्रपटांप्रमाणे पोस्टर्स लावून 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाची माहिती लोकांना दिली जावी, अशी मागणी हिंदूप्रेमींनी केली.

चित्रपटातून सत्य समोर आणले

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : काश्मीरमधील पंडितांच्या पलायनावर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे. काश्मीरमध्ये हिंदूंवर मोठा अन्याय, अत्याचार करण्यात आला. सत्य दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. सत्य दाबून टाकण्यासाठी एक इको-सिस्टीम कार्यरत आहे. मात्र चित्रपटाद्वारे हे सत्य समाजासमोर आणले गेले. भविष्यात असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत, असे प्रतिपादन मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

भाजप खासदारांच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाला विरोध करणार्‍यांना खडे बोल सुनावले. मोदी म्हणाले, सत्य गोष्टी समोर आल्या पाहिजेत. 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला विरोध करणारे लोक इतर वेळेस अभिव्यक्‍ती स्वांतत्र्याचे झेंडे घेऊन मिरवत असतात. जे लोक नेहमी अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन फिरतात, ती पूर्ण जमात मागील पाच-सहा दिवसांपासून खवळलेली आहे, असा टोला मोदींनी लगावला.

अशा चित्रपटांची निर्मिती व्हावी

चित्रपटाला विरोध करणारे आता हैराण झाले आहेत. जे सत्य एवढी वर्षे दाबून ठेवले ते कोणीतरी मेहनत करून बाहेर आणले. तर ते थांबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट उत्तम असून अशाप्रकारच्या आणखी चित्रपटांची निर्मिती करण्याची गरज आहे. हा चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

गोव्यात 'काश्मीर फाईल्स' होणार करमुक्‍त : मुख्यमंत्री

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकार लवकरच 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट करमुक्‍त करेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसह हा चित्रपट पाहिला.

चित्रपट पाहून झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हा चित्रपट अंगावर शहारे आणणारा आहे. देशातीलच इतिहास आजवर कसा दडपला गेला, याचे मूर्तिमंत उदाहरण या चित्रपटातून समोर आले आहे. खरा इतिहास समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. आजवर काश्मिरातील या इतिहासाबाबत मी ऐकले होते. काश्मीरमधील पंडितांवर 1990 मध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या अत्याचाराचे चित्रण या चित्रपटात आहे. दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांना एकतर धर्म बदला किंवा घरे सोडून जा किंवा मरा असे आदेश दिले होते. हजारो काश्मिरी पंडित जीवाच्या भीतीने घरे सोडून स्थलांतरित झाले.

हिंदूविरोधी घटकांचे षड्यंत्र

दै. 'पुढारी'शी बोलताना जयेश नाईक म्हणाले की, दोन दिवसांतच गोव्यातून हा चित्रपट गुंडाळण्याची तयारी हिंदुत्वविरोधी घटकांनी केली होती. आम्ही व्यवस्थापकाला हातही लावला नाही; पण त्याने आम्हाला उद्देशून अज्ञाताविरोधात फातोर्डा पोलिसांत तक्रार दिली. त्या दिवशी जे काही घडले त्याचा व्हिडीओ आहे. हिंदूविरोधी घटकांचे षड्यंत्र उघड झाले आहे. शो हाऊसफुल्ल असल्याचा कांगावा करून गोव्यात या चित्रपटाला दर्शक नाहीत, असे चित्र निर्माण करून दोन दिवसांत हा चित्रपट गुंडाळण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे. आमच्या प्रयत्नामुळे आयनॉक्समध्ये दिवसाला 19 वेळा हा चित्रपट दाखवला जात आहे. इतरही चित्रपटगृहांत या चित्रपटाचे खेळ सुरू आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news